पुणे – घटसर्प झाल्याच्या संशयाने ज्या मुलाचा मृत्यू झाला, त्याच्या घराच्या परिसरातील 200 घरांचा सर्व्हे महापालिकेच्या लसीकरण विभागाने केला आहे. तसेच नातेवाईकांशी संपर्क करून, मुलाच्या लसीकरणाबाबतही माहिती घेतली आहे.
घटसर्प झाल्याच्या संशयाने पर्वती भागातील जनता वसाहतीतील एका मुलाचा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीमध्ये त्याचे वय 7 वर्षे असल्याचे समजले होते, मात्र त्याचे वय 11 वर्षे आहे. त्याला लहानपणी कोणतीही लस देण्यात आली नव्हती, असे त्याच्या मावशीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. तसा जबाबही दिला आहे.
मृत मुलाचे वडील हे ऊस तोडणी कामगार आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी शेतावर ऊस तोडण्यासाठी जातात. त्यामुळे त्या मुलाचा सांभाळ करताना ते ज्या ठिकाणी राहिले, तेथे तरी त्याचे लसीकरण झाले आहे की नाही, याची माहितीही महापालिकेने घेतली आहे.
जनता वसाहतीत 200 घरांचा सर्व्हे महापालिकेने केला आहे. त्यामध्ये लसीकरण आणि साथरोगाबाबत पाहणी करण्यात आली आहे. अन्य कोणाला काही लक्षणे आहेत का, याचीदेखील नोंद करण्यात आली आली आहे. – डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण मोहिमेचे प्रमुख, मनपा