जेईई मेनसाठी सोयीचे परीक्षा केंद्र निवडता येणार

पुणे  – “करोना’ मुळे “जेईई मेन’ही प्रवेश परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) दिली आहे. यासाठी 14 एप्रिलपर्यंत मुदत आहे.

“जेईई मेन’च्या नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ही परीक्षा पार पडणार होती. मात्र,”करोना’ लॉकडाउनमुळे ही परीक्षा आता मेच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. “करोना’मुळे विद्यार्थी सध्या आपापल्या घरी आहेत. अनेक विद्यार्थी कोटा, हैद्राबाद, दिल्ली, पुणे, मुंबई यासह इतर शहरांमध्ये क्लाससाठी गेलेले होते.

परीक्षेच्या आधी शेवटच्या आठवड्यापर्यंत हे क्लास सुरू असतात. त्यामुळे विद्यार्थी क्लासच्या जवळचे सेंटर निवडतात. लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांनी पूर्वी निवडलेले सेंटर त्यांना आता अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन “एनटीए’ने यात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईचे सेंटर निवडण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत संधी दिली आहे.

“एनटीए’च्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी त्यांच्या सोईचे शहर सेंटर म्हणून निवडू शकणार आहेत. देश आणि परदेशांत 200 पेक्षा जास्त शहरांमध्ये “जेईई मेन’ची परीक्षा होते. त्यात महाराष्ट्रात 23 शहरांमध्ये सेंटर आहेत. महाराष्ट्रातून पुणे, हैद्राबाद आणि कोटा येथे विद्यार्थी क्लाससाठी जातात. त्यांना याचा फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.