पुणे- देशातील आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई ऍडव्हान्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेसाठी दि.8 जून ते 14 जून या कालावधीत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. याची परीक्षा 3 जुलै 2022 रोजी होणार आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली जेईई मेन्स परीक्षेतील पात्र ठरलेले उमेदवार जेईई ऍडव्हान्स परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेसाठी शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जूनपर्यंत आहे. जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी हॉलतिकीट 27 जूनपासून अधिकृत जेईई ऍडव्हान्स संकेतस्थळावर उपलब्ध असेल. परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना पेपर- 1 मध्ये उपस्थित राहण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 12 आणि पेपर- 2 नसाठी दुपारी 2.30 ते 5.30 पर्यंत वेळ देण्यात येणार आहे.
परीक्षा संपल्यानंतर 9 जुलैपर्यंत तात्पुरती उत्तरतालिका (आन्सर कीज्) संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. जेईई ऍडव्हान्सची निकालासह अंतिम उत्तरतालिका 18 जुलैपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्समध्ये सहभागी होण्यासाठी 2,800 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि दिव्यांग व्यक्ती श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी, नोंदणी शुल्क 1,400 रुपये असेल.