मतपत्रिकेवर मतदान झाल्यास अस्तित्व संपण्याची भाजपला भीती – जयंत पाटील

कोल्हापूर – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा कारभार आणि पक्षात असणाऱ्या इनकमिंग वरती टीका केली आहे. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान झालं तर आपलं अस्तित्व संपेल, अशी भाजपला भीती वाटत आहे, असं विधान जयंत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज आपल्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान झाले की आपले अस्तित्व राहणार नाही याची भीती भाजपला आहे. राज्यात भाजपची ताकद नाही हे त्यांना सुद्धा माहीत आहे. त्यामुळे दिसेल त्यांना पक्षात बोलावण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूरात केली.

यावेळी जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने मते मागितली. आता ते आमचेच लोक पक्षात घेऊन मते मागत असतील तर त्यांच्याकडे कोणती नैतिकता राहिली असा त्यांना माझा सवाल आहे.

शिवाय कोल्हापुरातील काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. याबाबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, ‘त्या नेत्यांना कोणती भीती दाखवली, कोणाच्या मागे कोणती चौकशी लावली हे दोन वेगळे वेगळे विषय आहेत पण आमच्या पक्षातील कोणी पक्षातून जातील’, असे मला वाटत नाही. कारण सगळेच नेते माझ्या संपर्कात आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंग आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांनी निवडणुकीपूर्वी अशीच पदयात्रा केली, पण त्या दोघांचेही सरकार पडले. आता भाजपच्या तिसऱ्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यात्रा सुरू असली तरी आता त्यांचे सरकार सुद्धा आता पडणार आहे. न केलेल्या कामांचा उहापोह ते करीत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हे कदापिही मान्य करणार नाहीत आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरला नाहीये, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांचा नक्की पराभव करून दाखवू. असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि राष्ट्रवादी मधील कलगीतुरा अजूनच रंगणार असल्याचे चित्र यावरून स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.