विद्यार्थ्यांसमवेत घेतला परिपाठाचा आनंद
भिगवण- येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दैनंदिन विद्यार्थ्यांचा परिपाठ सुरू असताना अचानकपणे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शाळेला अचानक भेट दिली. काही क्षणांतच परिसरातील वातावरण बदलून गेले. परंतु आमदार भरणे यांच्या सूचनेवरून शालेय परिपाठ सुरू ठेवण्याच्या सूचना मिळतात. यावेळी स्वतः आमदार भरणे विद्यार्थ्यांच्या रांगेत उभे राहून परिपाठामध्ये सहभागी झाल्यानंतर शाळा प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर दिलखुलास संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांना हुरूप आला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार भरणे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकली. शिक्षक वर्गाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करताना बालपणातील शालेय जीवनातील आपले आवडते शिक्षक व शालेय जीवनातील आठवणी यानिमित्ताने उलगडून सांगितल्या. आमदार भरणे यांचा एक दिवसाचा शालेय परिपाठ घेण्याचा योग आल्याने त्यांचाही आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी आमदार भरणे यांचा शाल, श्रीफळ देऊन शिक्षक बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समितीचे सदस्य दादासाहेब वणवे, भिगवण रोटरी कल्बचे माजी अध्यक्ष सचिन बोगावत, महेश शेंडगे, सरपंच अश्विनी शेंडगे उपसरपंच संदीप वाकसे, अजिंक्य माडगे, आबासाहेब देवकाते, आण्णासोहेब धावडे, प्रदीप वाकसे, बापूराव थोरात, गणेश राश्रे, राजाभाऊ देवकाते उपस्थित होते.