परभणी – डेंगी आजारामुळे उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला. विष्णू बडे (वय 38) असे शहीद जवानाचे नाव आहे. ते गंगाखेड तालुक्यातील पांढरगाव येथील रहिवाशी असून भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद येथे हवालदार पदावर कार्यरत होते. सिकंदराबाद येथे उपचारा दरम्यान 8 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गंगाखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
आज संत जनाबाई शाळेजवळील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंतयात्रेत शालेय विद्यार्थी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रादरम्यान देशभक्तीपर गीत व तिरंगा झेंड्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठान बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. शहरातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलातील दोन अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
तसेच परभणी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहीद बडे मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अंत्यविधीच्या वेळी हजारो उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विष्णू बडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. बडे यांच्या जाण्याने पांढरगावासह संपूर्ण तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.