परभणी – गंगाखेड तालुक्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानोबा फड यांना अर्धांगवायूचा झटका आला असून त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुकाप्रमुख फड यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात फोन करून आवश्यक उपचार करण्यास सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानोबा फड हे पक्षाच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यांना शनिवारी रात्री झोपेत असतानाच अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आवश्यक उपचार करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, ज्ञानोबा फड हे मुळचे गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील आहेत. गेली 30 वर्षांपासून ते शिवसेनेत काम करतात. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर फड यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना गंगाखेड तालुक्याचे तालुकाप्रमुख पद देण्यात आले. फड हे सर्वसामान्यांच्या हाकेला धाऊन जाणारे कार्यकर्ते म्हणून तालुक्यात परिचित आहेत. हसरा चेहरा , मनमिळावू स्वभाव आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने तालुक्यातील सर्वांचे ते आवडते नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती समजताच खादगावसह तालुक्यातील मंडळी फड हे लवकर बरे होऊन घरी परतावेत, अशी प्रार्थना करत आहेत.