मनिला (फिलिपाईन्स) :- अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रामध्ये संयुक्त नौदल सराव करण्याचे ठरविले आहे. फिलिपाईन्सच्या किनारपट्टीपासून जवळच हा युद्धसराव होणार आहे, अशी माहिती फिलिपाईन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दिनांक पाच ऑगस्ट रोजी चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजाने फिलिपाईन्सच्या जहाजावर पाण्याचे फवारे मारले होते. या समुद्रावर चीनने हक्क सांगितला असल्यामुळे फिलिपाईन्सच्या जहाजाच्या प्रवासाला चीनने आक्षेप घेतला होता. त्यामुळे चीनची मक्तेदारी मोडून काढण्याच्या हेतूनेच या संयुक्त नौदल सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संयुक्त नौदल सरावामध्ये तीन विमाने आणि हेलिकॉप्टरवाहक नौका सामील होतील. किनाऱ्याजवळच्या युद्धसरावानंतर या युद्धनौकांचे कमांडर मनिलामध्ये फिलिपिनो समकक्षांशी भेटणार आहेत, असे फिलिपिन्सच्या दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
या संयुक्त नौदल सरावासाठी अमेरिका “यूएसएस अमेरिका’ ही विमानवाहू नौका तैनात करण्याची योजना आखत आहे, तर जपान हेलिकॉप्टरवाहक जेएस इझुमो ही सर्वात मोठी युद्धनौका पाठवेल. तर रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाकडून आपले “एचएमएएस कॅनबेरा’ ही युद्धनौका पाठवली जाईल. या युद्धनौकेवर हेलिकॉप्टर असणार आहेत.