जांगीपूर : मुखर्जीपुत्रांची वाट बिकट

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मतदारसंघ असल्यामुळे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जांगीपूरची जागा पूर्वी सातत्याने चर्चेत असायची. प्रणवदा राष्ट्रपती बनल्यानंतर रिक्‍त झालेल्या या जागी त्यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी दोन वेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. मात्र सध्या पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेसचा जनाधार घटत चालला आहे. भाजपाचा वाढता विस्तार आणि कॉंग्रेसचे डाव्यांशी होऊ न शकलेले मनोमिलन यांमुळे यंदा अभिजित यांची वाट बिकट दिसत आहे. त्यांच्यापुढे यंदा या जागेवर वर्चस्व कायम राखणे हे आव्हानात्मक काम असणार आहे.

तृणमूल कॉंग्रेसने जांगीपूरमधील खलीलुर्रहमान यांना तिकिट दिले आहे. 2009 मध्ये 1.28 लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूूक जिंकणाऱ्या प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती बनण्यासाठी 2012 मध्ये या जागेचा राजीनामा दिला. त्यावर्षी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये अभिजित कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले पण त्यांना मिळालेले मताधिक्‍य केवळ 2500 मतांचे होते. तीन वर्षांमध्ये कॉंग्रेसचा मतांचा आकडा घटत गेला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये 20 टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली आहे. 2009 आणि 2012 मध्ये या मतदारसंघातून तृणमूल कॉंग्रेसने उमेदवार दिलेला नव्हता. 2014 मध्ये तृणमूल कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली. तृणमूलच्या उमेदवाराला 18.54 टक्‍के मते मिळाली. जांगीपूर लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये कॉंग्रेसला 54.24 टक्‍के मते मिळाली होती आणि माकपाला 40.52 टक्‍के. भाजपाला केवळ 2 टक्‍के मतांवरच समाधान मानावे लागले होते.

2014 मध्ये भाजपाचा टक्‍का वाढून 6.95 टक्‍क्‍यांवर गेला. 67 टक्‍के अल्पसंख्य लोकसंख्या असणाऱ्या या क्षेत्रात कॉंग्रेस वगळता अन्य पक्षांनी अल्पसंख्याक उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपाकडूून माफूजा खातून या रिंगणात आहेत. त्या पश्‍चिम बंगालमधील भाजपाच्या पहिला अल्पसंख्याक महिला उमेदवार आहेत. खातून या आतापर्यंत दोन वेळा दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील कुमारगंजमधून माकपाकडून विजयी झालेल्या आहेत. 2016 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.