पवना धरणात बुडून पुण्यातील दोन महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू

पवनानगर – पवना धरण परिसरात पर्यटनासाठी मित्र आणि मैत्रिणीसमवेत आलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ब्राम्हणोली गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे.

सुजित जनार्दन घुले (वय 21, सध्या रा. एमएमसीए हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे, मूळ रा. अहमदनगर), रोहित राजकुमार कोटगिरे (वय 21, सध्या रा. एमएमसीए हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे, मूळ रा. नांदेड) असे पवना धरणात बुडून मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन युवकांची नावे आहेत. ते पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेज, कर्वेनगर येथे अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होते.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित आणि रोहित यांच्यासह 11 मित्र-मैत्रिणी सोबत मंगळवारी सकाळी पुण्यातून त्यांच्या दुचाकीवरून पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. ते सकाळी अकराच्या सुमारास पवना धरणाजवळ ब्राम्हणोली गावच्या हद्दीत पोहचले. यावेळी सर्वजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले होते.
धरणाकाठी असलेल्या सुजित आणि रोहितचा पाय घसरल्याने ते दोघे धरणांच्या पाण्यात पडले. या वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यामध्ये अपयश आल्याने अखेर दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी दुपारी तीन वाजता स्थानिकांनी सुजितचा मृतदेह बाहेर काढला होता. तर रोहितचा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजता लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाने बाहेर काढला आहे.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक दिपक लुकडे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार एस. एम. शेख व जितेंद्र दीक्षित तपास करीत आहेत. या वेळी शिवदुर्ग रेस्क्‍यू टीमचे अनिल आंद्रे, रोहित आंद्रे, अतुल लाड, मोरेश्‍वर मांडेकर, कपिल दळवी, महेश मसने, आनंद गावडे, दुर्वेश साठे, राजेश ठाकर, सनी कडू, प्रवीण ढोकळे, समीर जोशी, राजेंद्र कडू, सुनील गायकवाड.प्रणय अंबुरे सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.