नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याासाठी सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहीम अद्याप सुरु आहे. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीनगर येथील झदिबल आणि झूनिमर पोझवालपोरा या भागात दहशतवादी लपून बसल्याची खबर सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा रक्षकांनी येथे शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्याला आपल्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.
#UPDATE Zadibal Encounter – Another terrorist killed. Operation going on. Further details shall follow: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) June 21, 2020
दहशतवादी लपून बसल्याचे उघड झाल्याने श्रीनगर शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या तीन दहशतवाद्यांच्या पालकांना घटनास्थळी आणण्यात आले. यावेळी या पालकांनी आपल्या मुलांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी याला नकार दिला, अशी माहिती काश्मीर पोलिसांनी दिली.
“आमच्या सुत्रांच्या माहितीवरुन दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. त्यानंतर या पालकांनी आपल्या मुलांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी यासाठी नकार दिला. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी दोघे जण २०१९ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होते. गेल्या महिन्यांत दोन बीएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात यांतील एक जण सामिल होता, अशी माहिती पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी दिली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.