गिरीशचंद्र मुरमू , आर. के. माथुर लडाखचे नायब राज्यपालपदी नियुक्ती
नवी दिल्ली : राज्यपालपदावरून वादग्रस्त वक्तव्य करणारे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली करण्यात आली आहे. राज्यपालपद हे अत्यंत दुर्बल असते, राज्यपालांना पत्रकार परिषद आयोजित करण्याचे अथवा आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करण्याचे अधिकारही नसतात, असे वक्तव्य दोनच दिवसांपूर्वी करणारे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर आता त्यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सनदी अधिकारी गिरीश चंद्र मुरमू आणि आर. के. माथुर यांची अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे शुक्रवारी राष्ट्रपती भवनातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. मुरमू हे नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत तर माथुर गेल्या नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत.
गिरीशचंद्र मुरमू हे 1985 च्या तुकडीचे गुजरात श्रेणीचे सनदी अधिकारी असून ते केंद्रीय अर्थमंत्रालयात सचिव (खर्च) आहेत. तर आर. के. माथुर हे 1977 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असून त्यांनी संरक्षण सचिव आणि माजी मुख्य माहिती आयुक्त ही पदे भूषविली आहेत.
जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट रोजी कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला.