पॅनेलवरुन काढले : स्थळ पाहणी न करताच केले अंदाजपत्रक
पिंपरी – रस्ता विकसित करण्याच्या कामाची स्थळपाहणी न करता मोघम अंदाजपत्रक तयार करणाऱ्या सल्लागाराला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. हे काम या सल्लागाराकडून काढून घेत महापालिकेच्या सल्लागार पॅनेलमधूनही या सल्लागाराची गच्छंती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमणुकीचा पायंडा पडला आहे. महापालिकेच्या सल्लागार पॅनेलवर मेसर्स आकार अभिनव यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीने या नेमणुकीला 7 फेब्रुवारी 2018 रोजीच्या आदेशान्वये मान्यता दिली आहे. प्रभाग क्रमांक 7, चऱ्होली येथील हिरामाता पूल ते खडकवासला वस्ती हा 30 मीटर डी. पी. रस्ता विकसित करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून आकार अभिनव यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, त्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता या कामाचे अंदाजपत्रक तयार केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत महापालिकेने खुलासा मागविला होता. परंतु, त्यांचा खुलासा समाधानकारक न वाटल्याने त्यांना सल्लागार पॅनलवरुन काढण्यात आले आहे.
परिणामी हिरामाता पूल ते खडकवासला वस्ती रस्ता विकसित करण्याच्या कामासाठी नव्याने सल्लागार नेमण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली. महापालिकेने सल्लागार संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यामध्ये मेसर्स अँशुअर्ड इंजीनियरिंग सर्व्हिसेस यांनी 1.49 टक्के दर सादर केला. महापालिकेकडे प्राप्त झालेल्या एकूण प्रस्तावांपैकी त्यांचा दर लघुत्तम असल्याने आता त्यांना हे काम देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.
अँशुअर्ड इंजिनिअरींग सर्व्हिसेस हे महापालिकेच्या पॅनलवर आहेत. तसेच त्यांच्याकडे इतर प्रकल्पांचे काम असून त्यांचे काम समाधानकारक असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. आगामी स्थायी समितीच्या सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. महापालिकेत सल्लागारांचे पेव फुटले असताना दुसरीकडे आयुक्तांनी कारवाईचे धाडस दाखविल्याने महापालिकेच्या सल्लागारांमध्ये खळबळ उडाली आहे.