बोनस तर दूरच पगारही लवकर नाही : पाश्चात्य रंगात रंगल्या कंपन्या
पिंपरी – बड्या कंपन्यात काम करणारे आणि आयटी क्षेत्रातील आयटीयन्सची यंदाची दिवाळी खूपच फिकी आहे. आयटी क्षेत्रासोबत इतर क्षेत्रातील कंपन्यांमध्येही “आयटी कल्चर’ रुजले असल्याने दिवाळीचा बोनस असा काही प्रकार नसतो. त्यात दिवाळी महिनाअखेरीस आल्याने आयटीयन्स आणि बड्या कंपन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी काटकसरीत जाणार आहे.
उद्योगनगरीतील कित्येक लहान कंपन्या बोनस देत नसल्या तरी दिवाळीपूर्वी पगार देतात, परंतु आयटी आणि काही बड्या कंपन्यांना भारतीय सणांशी काहीही देणे-घेणे नसते. दर महिन्याला तीस तारखेला पगार देणाऱ्या कंपन्यांना चार दिवस आधी पगार देणे देखील मान्य नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता एचआर विभागाकडून सांगण्यात येते की भारतात सर्व प्रकारचे धर्म असल्याने सणांबाबत विचार करता येणे शक्य नाही.
पूर्णत पाश्चात्य रंगात रंगलेल्या कंपन्यांनी दिवाळीपूर्वी पगार न केल्याने याचा मोठा फरक शहरातील बाजारपेठेवर पडताना दिसत आहे. धनत्रयोदशीचा सण असतानाही आयटीयन्स राहत असलेल्या उच्चभ्रू परिसरातील बाजारांमध्ये अजूनही दिवाळी रौनक दिसून येत नाही. याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
एकच दिवस सुट्टी
शक्यतो कोणत्याही भारतीय सणांना सुट्टी न देणाऱ्या आयटी कंपन्या दिवाळीला सुट्टी देतात, परंतु तीही कंजुषीने. आयटी कंपन्यांनी केवळ एक दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. तसेच विदेशी कंपन्यांसोबत अलायन्स करणाऱ्या भारतीय कंपन्यांनी देखील तीच संस्कृती राबविण्यास सुरुवात केली असून सुट्टी देण्यास नकार दिला आहे. त्यात यावर्षी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन रविवारी आले असल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी तर करता येणार आहे, परंतु महिना अखेर असल्याने अगदी काटकसरीने.
बोनसचा विचित्र प्रकार
भारतीय लहान कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार बोनसचे वाटप करुन दिवाळी गोड करतात. परंतु आयटी आणि इतर क्षेत्रातील बड्या कंपन्या एप्रिल-मे महिन्यात बोनस देतात. परंतु तो मिळेलच आणि मिळाला तर किती मिळेल, याची काहीच शाश्वती नसते. परफॉर्मेंसच्या नावाखाली उच्च पदावर बसलेले अधिकारी आपल्या जवळच्या खास माणसांनाच चांगला बोनस देतात. बाकीच्यांना मात्र तुमचे काम चांगले नसल्याचे कारण सांगून कमी पगारवाढ देण्यात येते. तसेच काहीही न बोलता सार्वजनिक अपमानाचा उपहार दिला जातो. संपूर्ण महिनाभर कंपन्यांमध्ये कुणाला किती बोनस मिळाला यावरुन कोण कसे काम करते याची विचित्र पद्धतीने चर्चा सुरु असते. एका कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचाऱ्याने सांगितले की बोनसचा महिना हा अनेक कर्मचाऱ्यांसाठी “इन्सल्ट’ आणि “डिप्रेशन’चा महिना असतो.