जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड शहरातील एका 70 वर्षीय करोना संशयिताचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल नुकताच प्रशासनास प्राप्त झाला असून, तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जामखेडला करोनाचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरसह नऊ व्यक्तींना नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच संबंधित डॉक्टरची खासगी ओपीडी सील करण्यात आली आहे.
जामखेड येथील एका 70 वर्षीय व्यक्तीचा नगर येथे जिल्हा रुग्णालयात चार दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या मृत्यूबाबत डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी चार दिवसांपूर्वी मयत व्यक्तीचा स्त्राव पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवला होता. मात्र, त्याचा अहवाल न आल्याने संबंधित व्यक्तीचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. शनिवारी (दि. 18) रात्री उशिरा हा अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाला. त्यात संबंधित व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.
जामखेड येथील मयत व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा प्रशासन कामाला लागले असून, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच जणांना, तर नगर येथे पाठवण्यापूर्वी या व्यक्तीवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्या रुग्णालयातील डॉक्टरसह कर्मचारी व उपचार घेत आसणाऱ्या दोन रुग्णांना नगर येथे हलवण्यात आले, तर इतर रुग्णांची प्रकृती चांगली आसल्याने त्यांना डिस्चार्ज देऊन संपूर्ण रुग्णालय खाली करण्यात आले आसल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली.
तसेच हॉस्पिटलमधील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टर, दोन कर्मचारी व एक फार्मासिस्ट, अशा चार जणांना तातडीने तपासणीसाठी नगर येथे दाखल करण्यात आला आहे. अशा एकूण मयत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांची करोना तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा 14 दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे देखील याच दिवशी स्पष्ट झाले होते. तर जामखेड येथील मयत रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांचा आकडा दोनने वाढला आहे.