जामखेड -करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहूनच जिल्हा प्रशासनाने जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर केले असतांना बुधवारी रात्री आणखी दोन करोना बाधित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जामखेड शहरात करोनाच्या रुग्णांची संख्या 11 वर गेली आहे. त्यामुळे जामखेडकरांची चिंता चांगलीच वाढली असून प्रशासनाने देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहे. यापूर्वी 3 मेपर्यंत जामखेड शहर पूर्णपणे बंदच राहणार होते. त्यात वाढ करून आता 6 मेपर्यंत बसकूच बंद राहणार आहे.
मयत व्यक्तीच्या दोन मुलांना दोन दिवसांपूर्वीच करोना झाल्याचे स्पष्ट झाले असतांना बुधवारी रात्री या दोघांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या दोघा मित्रांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशीरा त्यांचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटस्पॉट केंद्र म्हणून 6 मेपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही बाधित जामखेड येथील आहेत. काही दिवसांपूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता करोना लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या आता 11 झाली असून यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. एका व्यक्तीचा मुत्यू झाला असून आधीच्या 4 जणांचा अहवाल दि. 19 एप्रिल रोजी निगेटिव्ह आले होते.
शहरात 6 व्यक्ती करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून 10 एप्रिलला जाहीर करण्यात आले होते. हॉटस्पॉट केंद्र हे 4 दिवसांसाठी करण्यात आले होते.त्यानंतर 14 तारखेला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा हॉटस्पॉट आदेश काढून 10 दिवस वाढविले होते. त्या हॉटस्पॉटची मुदत 23 एप्रिलपर्यंत रात्री 12 पर्यंत होती. परंतु त्यानंतर 18 एप्रिल रोजी एका व्यक्तीला करोनाची बाधित असतांना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे निर्देशना असल्यानंतर पुन्हा हॉटस्पॉटला मुदतवाढ देवून 1 मे करण्यात आली.
नंतर या मृत पावलेल्या व्यक्तींच्या दोन मुलांना देखील करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही मुदत 3 मेपर्यंत वाढविण्यात आली. बुधवारी रात्री त्यात आणखी दोन करोना रुग्णांची भर पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 6 मेपर्यंत सबकुछ बंदचा आदेश दिला आहे.त्यामुळे जामखेड अजून 14 दिवस हॉटस्पॉट केंद्र म्हणून राहणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही येथे लवकर गर्दी होणार नसल्याने व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे.
करोनाचे रुग्ण नसलेल्या ठिकाणी प्रशासन काही अंशी सूट देताना दिसत आहे. परंतु, ज्या ठिकाणी असे रुग्ण सापडत आहेत, तेथे आगामी काळात अजून लॉकडाऊनची भिती असल्याने शहरातील नागरिकांमध्ये हॉटस्पॉट कधी संपेल, याबाबत संभ्रम आहे. या हॉटस्पॉटच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवा व वस्तू घरपोच मिळणार आहे. आता गेल्या 12 दिवसांपासून जामखेडकरांना सवय झाली आहे. त्यामुळे फोनवरून मागणी नोंदवून वस्तू घरपोच मिळविल्या जात आहेत.
आता कडक बंदोबस्त
जामखेड येथील चार रुग्ण बरे झाले आहेत तरी हॉटस्पॉट केंद्र आहे. त्यात आता आणखी चार करोना रुग्णांची भर पडल्याने तेथील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. येत्या 6 मेपर्यंत हीच स्थिती राहील, असे आदेश प्रशासनाने दिले असल्याने हॉटस्पॉट असेपर्यंत जामखेडला सूट मिळण्याची शक्यता नाही.