राजगुरूनगर – लॉकडाऊन काळात भाजीपाला, औषधे, किराणा व इतर कारणांसाठी राजगुरूनगर शहरात गेल्या काही दिवसांत गर्दी होऊ लागल्याने शुक्रवार (दि 24) पासून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी दिली.
करोना समुह संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी प्रांत कार्यालयात गुरुवारी (दि. 23) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्णय झाल्याचे टोम्पे यांनी सांगितले. या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील, प्रांत अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आदी उपस्थित होते.
या बैठकीत ठरल्याप्रमाणे शहरात येणाऱ्या वाडा रस्ता वगळून सर्व रस्त्यावर वाहन बंदी लागू केली आहे. या रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीची कडक पोलीस तपासणी होणार आहे. अत्यावश्यक खरेदी करण्यासाठी निर्धारित केलेल्या अवधीत सुद्धा वाहन बंदी लागु राहणार आहे. नाहक वाहन फिरवून लॉकडाऊन भंग करणाऱ्या वाहनांची थेट जप्ती केली जाणार आहे. जप्त केलेली सर्व वाहने हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व सिद्धेश्वर मंदिर मैदानावर ठेवण्यात येतील. पोलीस बळ मर्यादित आहे.
बंदोबस्त करण्यासाठी सुसुत्रता यावी व नागरिकांना करोना संसर्गा पासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे. पिकविलेला भाजीपाला, तरकारी बाजारात विक्रीसाठी आणताना प्रशासनाचे सहकार्य मिळावे. तसेच या माध्यमातून शहरातील नागरिक, नोकरदारांना रास्त दरात भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.
…त्यांना क्वारंटाइन करा
पुणे शहर पूर्णतः सील असून पुण्यावरून शासकीय अधिकारी, कंपन्यांचे अधिकारीवर्ग कामासाठी खेड, आंबेगाव, जुन्नर शिरूर, तालुक्यात ये-जा करीत आहेत. टोल नाका सुरू झाल्याने येथील चांडोली टोल नाक्यावर असलेले अधिकरी-कर्मचारी मालेगाव व भोसरी येथून येत असल्याने त्यांना क्वारंटाइन करण्याचे प्रयत्न खेड पंचायत समितीकडून करण्यात आला आहे.
राजगुरूनगर परिसरातील कंपन्यांमध्ये बाहेरून कच्चा माल आणणारे ट्रक येत आहेत. माल घेऊन आलेले ट्रक चालक करोना विषाणूबाबतची काळजी घेत नसल्याने पंचायत समितीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे.