जळगाव – येथील शिवाजी नगर परिसरात तीन मजली इमारत कोसळली आहे. यात एका महिलेला वाचविण्यात यश आले असून एक महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या 70 वर्षीय महिलेला वाचविण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मनपा महापौर जयश्री महाजन, आयुक्त विद्या गायकवाड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवाजी नगर परिसरात मशिद समोर तीन मजली जुनी इमारत होती. ती आज मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला दुसरीकडे राहत होत्या. कधीतरी या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत होत्या. आज सकाळी अचानक ती इमारत कोसळली. त्यात या दोन्ही महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या. दरम्यान, लागलीच बचावकार्य सुरू केल्याने दोघांपैकी एका 52 वर्षीय महिलेला बाहेर काढण्यात यश आले. तर दुसऱ्या महिलेला शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
दरम्यान, दुर्घटनेचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. जळगाव शहरात इमारत कोसळल्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाली आहे. या इमारतीखाली 75 वर्षाची एक व्यक्ती दाबल्या गेल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. दोन जणांना वाचविण्यात यश आल आहे. महापालिकेच्या पथकाकडून बचावकार्य सुरू असून काही वेळानंतर इमारतीखाली दाबल्या गेलेल्या व्यक्ती संदर्भात नेमकी माहिती समोर येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.