जयपूर – जयपूरच्या महापौर सोमय्या गुर्जर, नगरसेवक अजयसिंह चौहान आणि पारस जैन (तिघेही भाजप) या तिघांनी महापालिका आयुक्तांना धक्काबुक्की केल्याने त्यांचे आज महापालिकेतून निलंबन करण्यात आले आहे. राज्य सरकारने त्यांच्या कृत्याच्या चौकशीचाही आदेश दिला आहे. या तिघांखेरीज अपक्ष नगरसेवक शंकर शर्मा यांनाही महापालिकेतून निलंबित करण्यात आले आहे.
आयुक्तांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. आयुक्त यग्यमित्रा सिंह देव हे महापौरांच्या कक्षात बैठकीसाठी गेले असता कचरावेचण्यासाठी कंपनीच्या नियुक्तीबाबत महापौरांनी आयुक्तांशी वाद घातला. त्यामुळे आयुक्त बैठक सोडून निघून जाण्यास निघाले तेव्हा वरील चौघांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला.
या प्रकाराची गंभीर दखल घेत कॉंग्रेस सरकारने महापौरांसह अन्य तिघांचे सदस्यत्वच निलंबित केले. दरम्यान या कारवाई वरून भाजपने कॉंग्रेस सरकारवर जोरदार आक्षेप घेतला आहे. ही कारवाई कॉंग्रेस सरकारला महागात पडेल आता त्यांचे सरकारच सत्तेवरून आम्ही घालवू असा इशारा प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया यांनी दिला आहे.