नवी दिल्ली- जवळपास दशकभराची वाट बघितल्यानंतर भारतीय नौदलाला अमेरिकेकडून मल्टीरोल हेलिकॉप्टर मिळणार आहेत. “एमएच-60’रोमिओ ही हेलिकॉप्टर अमेरिकेकडून पुढच्या वर्षी जुलै महिन्यात भारताला मिळणार आहेत. ही हेलिकॉप्टर चालवण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय पायलटांचे एक पथक अमेरिकेला रवाना झाले आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यान 2020 मध्ये 24 हेलिकॉप्टर खरेदीसाठी 16 हजार कोटी रुपयांचा करार केला गेला आहे. तोही हेलिकॉप्टर अमेरिकेतील लॉकहिड मार्टिन कंपनीकडून सरकार ते सरकार पातळीवरून खरेदी केली जाणार आहेत. जुलैमध्ये यापैकी 3 हेलिकॉप्टर मिळणार आहेत, असे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.
एमएच -60 रोमिओ हेलिकॉप्टर मल्टी-मोड रडार आणि नाईट-व्हिजन डिव्हाइससह सुसज्ज असतील. तसेच हेलफायर क्षेपणास्त्रे, टॉरपिडो आणि अचूक-निर्देशित शस्त्रास्त्रांनीही ही हेलिकॉप्टर सुसज्ज असतील. या हेलिकॉप्टरची रचना फ्रीगेट्स, डिस्ट्रॉयर, क्रूझर आणि विमान वाहकांकडून ऑपरेट करण्यासाठी केली गेली आहे.
पाणबुड्या शोधण्यासाठी तसेच जहाजांवर मारा करण्यासाठी आणि समुद्रावर शोध-बचाव ऑपरेशन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. सी किंग्ज हेलिकॉप्टरच्या जागेवर हे हेलिकॉप्टर नौदलामध्ये रुजू केले जाणार आहे. सी किंग्ज हेलिकॉप्टर लवकरच सेवेतून थांबवण्यात येणार आहेत.