भिवंडी – भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गलगत डान्सबार चालकांना धमकावून 8 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून भाजप नगरसेवकाला रंगेहात अटक केली. या नगरसेवकाकडून 27 हजार रुपये देखील जप्त करण्यात आले आहे. नगरसेवक हितेश कुंभार, देवेंद्र खुटेकर व राकेश कुंभकर्ण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मुंबई नाशिक महामार्गालगत कोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिवंडी बायपास येथे अनेक डान्सबार आहेत. त्यापैकी लैला डान्सबार चालक संतोष भोईर व हरीश हेगडे पार्टनरशिपमध्ये चालवतात. या डान्सबारमध्ये हितेश कुंभार येऊन मी मुंबई भाजपचा नगरसेवक आहे व तुमचे बार चालवायचे असेल तर आर्केस्ट्रा बारचे 5 लाख रुपये व सर्विस बारचे 3 लाख रुपये असे एकूण 8 लाख रुपयांची मागणी केली. 25 हजार रुपये महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अशी डान्सबार चालकाकडे मागणी केली.
त्यावेळी बार चालकाने सांगितले की मी इतर डान्सबार चालकांना विचारून सांगतो. त्यानंतर हितेश कुंभार यांनी बार चालकाकडे गुडलक स्वरूपात पैशाची डिमांड केली. यावेळी सर्वांशी चर्चा करून गुडलक देऊ असे सांगितल्यानंतर हितेश कुंभार आपल्या साथीदारांसह निघून गेले.
दुसऱ्या दिवशी हितेश कुंभार पुन्हा लैलाबारमध्ये साथीदारांसह आले आणि खंडणीची मागणी केली. त्यावेळी 9 बार चालकांनी प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे एकूण 27 हजार रुपये जमा केले होते.