– अक्षय भुजबळ
यंदाच वर्ष बॉलीवूड इंडस्ट्रीसाठी म्हणावं तितकं चांगलं असं गेलेलं नाही. याउलट साउथ सिनेमांचा देशभरासह जगभरात गाजावाजा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. शाहरुख खानच्या पठाण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फार गल्ला कमावला असला तरी या सिनेमाने बॉलीवूडमध्ये सुरू असलेली टिपिकल कथानकाची लाईन काही सोडलेली नाही. तीच देशभक्ती.. तेच प्रेम.. तोच हिरो तोच खलनायक.. या पलीकडे या चित्रपटात वेगळा असा काही नव्हतं. याउलट यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या प्रत्येक साउथ सिनेमाने नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. आज आपण यंदाच्या साउथ सिनेमा कसा प्रगल्भ होत गेला याबाबत जाणून घेणार आहोत.
२०२३ या सालाचा अर्ध वर्ष उलटून गेल आहे. अशाच साउथ इंडस्ट्रीने के जी एफ २, आर आर आर, या सिनेमांचा रेकॉर्ड कायम ठेवत पोनियन सिल्वन 2, दसरा, शाकुंतलम असे दर्जेदार सुपरहिट चित्रपट दिले.याउलट बॉलीवूडमध्ये त्याच त्याच प्रेम कथा, हीरो-व्हिलन स्टाईल मूव्हीज पाहायला मिळाल्या.
आगामी उरलेल्या सहा महिन्यांमध्ये देखील साउथ इंडस्ट्रीची हवा पाहायला मिळणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये साउथचे असे काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ज्यांचा देशभरात नाही तर जगभर डंका पाहायला मिळेल. ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत जेलर, प्रभासचा सालार, लोकेश कनगराजचा लिओ, कमल हसनचा इंडियन 2, अशा बड्या बड्या चित्रपटांचा समावेश आहे.
आदीपुरुष सारख्या मेगा बजेट चित्रपटापूर्वी साउथ दिग्दर्शक लोकेश कनगराजने आपला आगामी चित्रपट लिओचा टिजर प्रदर्शित करत सर्वांना सुखद धक्का दिला. या चित्रपटाच्या टीजरने अवघ्या काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर मिलियन व्हीव मिळवले आणि साउथ इंडस्ट्रीचा दबदबा कायम ठेवला. अवघ्या चार चित्रपटांमुळे साउथ मध्ये चर्चेत आलेला कनगराचा हा चित्रपट राडा करणार हे निश्चित आहे. अभिनेता विजय या चित्रपटात मुख्य भूमिकेत असला तरी चित्रपटाचा थेट संबंध यापूर्वी कनगराच्या रिलीज झालेल्या काथी आणि विक्रम या चित्रपटांशी आहे.
म्हणून साउथ इंडस्ट्री बॉलीवूडच्या दहा पावले पुढे..
आगळे वेगळे विषय
एकीकडे बॉलीवूडमध्ये तेच तेच लव स्टोरी सिनेमे येत असताना साउथ इंडस्ट्री मात्र आगळ्यावेगळ्या विषयांना हात घालताना दिसते. ज्यामध्ये पुष्पा सारख्या चंदन चोरावर आधारित सिनेमाचा समावेश आहे. यासोबत बॉलीवूडमध्ये तेच तेच हिरो विलन चित्रपट येत असताना साउथ मध्ये मात्र हिरोला विलन रुपात दाखवणारा विक्रम एक नवा रेकॉर्ड बनवून जातो.
ओरिजनल कथानकांवर भर
बॉलीवूडमध्ये एकीकडे फ्लॉप चित्रपटांची मालिका सुरू झाली की बडे बडे कलाकार साउथ मधील कथानक घेऊन रिमेक करून हिट होण्याचा प्रयत्न करतात. याउलट साउथ मध्ये रीमेकचे प्रमाण तितकस दिसत नाही. ओरिजिनल कथानकांवर मोठ्या प्रमाणात भर देण्याचा येथील कलाकारांचा प्रयत्न असल्याचे पहायला मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कांतारा चित्रपट. देशाच्या एका कानाकोपऱ्यातील लोकसंस्कृती दाखवणाऱ्या या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकामुळे दखल घेण्यास भाग पाडले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
साउथ इंडस्ट्री चित्रपटांच्या बाबतीत जलद गतीने अपडेट होताना दिसते. ज्यावेळी बॉलीवूडमध्ये दबंग सारख्या सिनेमाने कमाई करून शंभर कोटी क्लबचा निर्माण केला होता. त्यापूर्वी साउथ इंडस्ट्रीने मगधीरा सारखा 100 कोटी रुपये बजेट असलेला सिनेमा बनवला होता. ॲक्शन सीन असो वा व्हीएफएक्स किंवा सिजीआय साऊथ इंडस्ट्री सर्वच बाबतीत खूपच फास्ट अपडेट होताना दिसते.
सांस्कृतिक वारसा जोपासल्याने प्रेक्षकही खुश
बॉलीवूडमधील नायकाला मॉर्डन किंवा श्रीमंत दाखवण्यासाठी अनेकदा विदेशात सिनेमा त्शूट केला जातो. यामुळे चित्रपट मोठा तर होतो परंतु प्रेक्षकांना तितकासा आपला वाटत नाही. याउलट साउथच्या दर तिसऱ्या चौथ्या चित्रपटात साऊथमधील प्रेक्षकांना आपल्याशा वाटणाऱ्या गोष्टी जसं की बालाजी मंदिर काही फेमस पर्यटन स्थळे अशी लोकेशन हमखास दिसतात. यामुळे प्रेक्षकांवर चित्रपटाचा चांगला प्रभाव तर पडतोच शिवाय त्यांना चित्रपट आपलासा वाटतो.
बदलत्या स्क्रीन प्लेची मांडणी
गेल्या काही वर्षांमध्ये बदलता स्क्रीनप्ले हा साउथ इंडस्ट्रीचा युएसपी बनला आहे. सोप्या शब्दात अर्थ सांगायचा तर कथानकाची सुरुवात मध्येच कुठेतरी करणे किंवा पहिल्या पर्टचा शेवट असा काही करणे जेणेकरून दुसऱ्या पार्टची उत्सुकता तयार होईल. एकूणच साउथ इंडस्ट्रीने सुरू केलेली कथानकाची मांडणीसाठीची नवीन स्क्रीनप्ले स्टाइल सर्वच सिनेमांना हटके बनवताना दिसते. यामध्ये इंडस्ट्रीतील आय, केजीएफ,बाहुबली अशा अनेक सिनेमांची नावे घेता येतील.
अशा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे सध्याच्या घडीला साउथ सिनेमा बॉलीवूडच्या दहा पावलं पुढे असल्याचे समजते. अशात आगामी काळात प्रदर्शित होणारा लिओ हा सिनेमा असाच एक भन्नाट ट्रेण्ड घेऊन येणार आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे लिओ पाहताना काथी आणि विक्रम या चित्रपटांची झलक अनुभवायला मिळणार आहे. कारण हे चित्रपट आपापसात गुंफलेले आहेत. लिओच वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना इतर दोन सिनेमांची कथा माहिती नसली तरी ते हा चित्रपट आनंदात एन्जॉय करणार आहेत. मात्र ज्यांना इतर दोन चित्रपटांची कथा माहिती आहे अशांना हा चित्रपट एक वेगळ थ्रील देऊन जाणार आहे. साउथ इंडस्ट्रीतील हा एक मोठा आगळावेगळा प्रयोग आगामी काळात एक ट्रेण्ड सेटर देखील ठरू शकतो.