मावळ – ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने मावळ परिसर दुमदुमला. महाराष्ट्र दिनानिमित्त विकासकामांचे भूमिपूजन, ज्येष्ठांचा सत्कार, विविध शासकीय कार्यालये व शाळांमध्ये ध्वजारोहण, विद्यार्थ्यांना निकालांचे वाटप अशा विविध कार्यक्रमांचे मावळ तालुक्यात ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मावळ तालुक्यात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.
लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करत, महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचा 62 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहन करत माझी वसुंधरा 3.0 ची सुरूवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, बांधकाम अभियंता मठपती मॅडम यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. लोणावळा शहराला स्वच्छ, सुंदर व हरित बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंग्याला सलामी दिली.
पिंपळोलीत सेवानिवृत ज्येष्ठांचा “कृतज्ञता सन्मान’
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पिंपळोली गावातील सेवानिवृत ज्येष्ठ कामगारांचा सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे या ज्येष्ठांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यामुळे हे नागरिक काहीसे भावूक झाले होते. यावेळी पिंपळोली तंटामुक्त अध्यक्ष संतोष बोंबले, रिपाइंचे मावळ तालुकाध्यक्ष सिध्दार्थ चौरे, माजी उपसरपंच, संदीप चौरे, योगेश सोमवंशी, श्रीकांत दळवी, रेखा होनावळे, स्वाती घोडेकर, वैजयंता रोकडे, सुरेखा बारवकर, स्वप्ना बोंबले, मुक्ताबाई बोंबले, वत्सला गुजर, एकनाथ शिंदे, पप्पु सुतार, सुनील लोखंडे, सुभाष गायकवाड, शिवभक्त चंद्रकांत बोंबले, विठ्ठल पिंपळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शालेय व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोली यांनी केले होते.
वडगाव नगरपंचायतीच्या विकासकामांचे भूमिपूजन
वडगाव नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमदार सुनील शेळके यांच्या विकास निधीतून तसेच नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक चंद्रजीत वाघमारे यांच्या प्रयत्नाने सुमारे 2 कोटी 22 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन रविवारी (दि.1) नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा पूनम जाधव, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, राहुल ढोरे, शारदा ढोरे, माया चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी विविध कार्यकारी सोसायटी संचालक राजेश भालेराव, संचालक प्रकाश कुडे सामाजिक कार्यकर्ते बिहारीलाल दुबे, सुधाकर वाघमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण ढोरे, उपाध्यक्ष संतोष खैरे, अविनाश कुडे, मंगेश खैरे, शरद ढोरे, दिपक भालेराव, विशाल वहिले, अनिल ओव्हाळ, सोपान पाटोळे, सचिन ओव्हाळ, अशिष भालेराव, गणेश पाटोळे, सिद्धार्थ भालेराव, सागर पाटोळे, गौतम सोनवणे, सोमनाथ धोंगडे, राहिल तांबोळी आणि प्रभागातील नागरिक, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सह्याद्री प्रतिष्ठानची हुतात्म्यांना मानवंदना
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गदिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. त्याच परंपरेने सह्याद्री प्रतिष्ठान मावळच्या वतीने किल्ले तुंग (कठिणगड) वर राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला. स्वराज्य स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या वीर मावळ्यांना तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या 105 हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्य स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या तमाम मावळ्यांना व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सह्याद्री प्रतिष्ठान चे कार्यकारी अध्यक्ष सचिन शेडगे सह्याद्री विद्यार्थी अकादमी अध्यक्ष चेतन वाघमारे, विशाल सुरतवाला, किशोर वाघमारे, ओमकार पाटील, अमोल तिकोने, तसेच स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.
नेहरू विद्यालयात महाराष्ट्र, कामगार दिनाचे महत्त्व विशद
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पंडित नेहरू विद्यालय, कामशेत शाखेत विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. अजिनाथ ओगले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे महत्व उपस्थित विद्यार्थी व पालकांना सांगितले.यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य उमेश सोनवणे, पर्यवेक्षिका धनश्री साबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सुषमा करपे व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद वाजे, सूत्रसंचालन नितीन शेलार, आभार दत्तात्रय पोवार यांनी मानले.
वेहेरगाव- दहिवलीमध्ये सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहन
वेहेरगाव- दहिवली ग्रामपंचायत कार्यालयमध्ये सरपंच अर्चना देवकर यांनी ध्वजारोहण करण्यात आले. तर उपसरपंच काजल पडवळ व ग्रामपंचायत सदस्या पूजा पडवळ यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहण शिक्षण समिती अध्यक्ष संतोष देवकर, पोलीस पाटील अनिल पडवळ व रेखा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड,राजू देवकर, शंकर बोरकर वर्षा मावकर, योगिता पडवळ, सुनील येवले, ग्रामसेवक गणेश आंबेकर, दिनेश पडवळ, मधुकर पडवळ, संदिप देवकर, मोरेश्वर पडवळ, अशोक पडवळ मुख्याध्यापक महादेव डोंबे उपस्थित होते.