पिंपरी -हौसेला मोल नसते. आपल्या वाहनला विशिष्ट नंबर असावा या हौसेने आरटीओला गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 13 कोटी 81 लाख 34 हजार 500 रुपये इतकी रक्कम मिळवून दिली. पसंतीचा वाहन क्रमांक मिळविण्यासाठी मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनचालक लाखो रुपये मोजत आहेत.
पसंतीच्या क्रमांकासाठी आरटीओ कार्यालयात 2 वाहनचालकांनी प्रत्येकी 4 लाख तर, 2 वाहनचालकांनी प्रत्येकी साडेचार लाख इतकी रक्कम मोजली आहे. शहरात 2021-22 या आर्थिक वर्षात 14 हजार 582 वाहनचालकांनी पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज केलेले आहेत. त्यासाठी झालेल्या लिलावापोटी त्यांनी एकूण तब्बल 13 कोटी 81 लाख 34 हजार 500 रुपये इतकी रक्कम आरटीओ कार्यालयाकडे जमा केली.
पसंतीचा वाहन क्रमांक मिळविण्यासाठी नागरिकांनी 3 हजार रुपयांपासून थेट साडेचार लाख रुपयांपर्यंत रक्कम मोजली आहे. लाखापेक्षा अधिक रक्कम 80 जणांनी मोजली आहे. केवळ 80 जणांनीच मिळून एक कोटी 36 लाख 40 हजार रुपये रक्कम आरटीओ कार्यालयात भरली.
गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) 49 वाहनचालकांनी पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी प्रत्येकी दीड ते दोन लाख मोजले होते. 43 जणांनी प्रत्येकी दीड लाख तर, 6 जणांनी प्रत्येकी 2 लाख 10 हजार इतकी रक्कम मोजली होती. एकूण 9 हजार 766 वाहनचालकांनी पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी 2020-21 या वर्षात एकूण 9 कोटी 26 लाख 60 हजार इतकी रक्कम भरली आहे.