महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा काल औरंगाबादला झाली. या सभेसाठीचे वातावरण मनसेने जितके तापवणे अपेक्षित होते त्यापेक्षा राज्यातील वृत्तवाहिन्यांनीच ते अधिक तापवले होते. एक विषय लावून धरायचा म्हणजे एकच विषय लावायचा, हे टीव्ही माध्यमांनी कसले नवीन तंत्र अवलंबले आहे त्याचे नीट आकलन होईनासे झाले आहे. पण गेले दोन दिवस म्हणजे राज ठाकरे हे आपल्या घरातून औरंगाबादला पोहोचेपर्यंत मधल्या प्रवासाचा सारा इत्थंभूत तपशील ऐकवत टीव्ही माध्यमांनी राज ठाकरेंच्या सभेविषयी लोकांमध्ये विलक्षण कुतूहल निर्माण करून ठेवले होते. त्यामुळे सभेला मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती.
भाषणाच्या थेट प्रक्षेपणालाही मोठा प्रतिसाद लाभला. एक शैली म्हणून त्यांचे भाषणही जोशपूर्ण झाले; पण हाताला फारसे काही लागले नाही. राज ठाकरे यांनी आता आपल्या पक्षाचा अजेंडा बदलला आहे, तो पूर्ण हिंदुत्ववादी केला आहे. हे अधिक जोरकसपणे लोकांमध्ये ठसवण्यासाठी त्यांची ही सभा त्यांना उपयुक्त ठरणारी असली तरी लोकांच्यादृष्टीने त्यात काही नवीन भाग नव्हता, हेही तितकेच खरे आहे. मनसे जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून कालच्या औरंगाबादच्या सभेपर्यंत या पक्षाचा नेमका अजेंडाच ठरत नव्हता, ही त्या पक्षाची खरी अडचण होती.
त्यामुळे त्यांच्या अनुयायांनाही स्वतंत्र सभा घेण्याचे फारसे धाडस होत नसायचे. अशी जरी सभा घ्यायची ठरवली, तरी त्यात बोलायचे काय, असा संभ्रम त्यांच्या अनुयायांना निश्चित पडत असणार. कारण पक्षाचे नेमके ध्येयधोरणच निश्चित नव्हते. आधी केवळ मराठी भाषिकांचा विषय त्यांनी लावून धरला होता; पण केवळ तेवढ्या कार्यक्रमावर पक्ष विस्तारण्याला खूपच मर्यादा होत्या. मुळात सध्याच्या प्रचलित राजकीय पद्धतीत तुम्ही जर एखादा स्वतंत्र पक्ष काढलात, तर तुम्हाला तुमचा कार्यक्रम आणि ध्येयधोरण आधी निश्चित करावे लागते. मग त्या अनुषंगाने त्या पक्षाचे अनुयायी ती लाइन धरून स्वतंत्रपणे प्रचार करू शकतात. पण येथे निश्चित ध्येयधोरणाचीच वानवा होती. कोणत्याही पक्षाने दोन बाबतीत आपले मत आधी निश्चित करणे येथील राजकीय पद्धतीत आवश्यक आहे, एक म्हणजे तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात, हिंदुत्ववादी आहात, की प्रादेशिक भूमिकेवर तुम्ही पक्ष चालवणार आहात हे निश्चित ठरणे आवश्यक असते. आणि दुसरे म्हणजे या देशातल्या अर्थकारणाविषयी तुमची भूमिका निश्चित असली पाहिजे, म्हणजेच तुम्ही खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक आहात की, कम्युनिस्ट शैलीच्या गोरगरीब आणि श्रमिकांसाठीच्या अर्थकारणाचे पुरस्कर्ते आहात हे तुम्ही निश्चित केलेले असले पाहिजे. मनसेमध्ये आतापर्यंत असले काहीच निश्चित नव्हते.
राज ठाकरे सभा घेऊन जी भूमिका मांडतील तीच त्या पक्षाची त्या दिवशीची भूमिका असायची. पण पुन्हा उद्या दुसऱ्या सभेत ते नेमकी काय भूमिका घेतील याचा अंदाज त्यांच्या अनुयायांनाही यायचा नाही, ही त्यांची मुख्य अडचण असायची. पण आता मात्र राज ठाकरे यांनी आपले राजकीय धोरण बऱ्यापैकी स्पष्ट केले आहे. त्यांनी आता मराठी भाषिकांचा मसिहा म्हणून कायम राहण्याऐवजी आता थेट हिंदुत्वाची कास धरली आहे. त्यामुळे त्यांना आता हिंदुजननायक अशी नवी बिरुदावली लावली गेली आहे. पक्षाच्या प्रचाराच्या पोस्टरवरही आता हिंदुजननायक असा शब्दप्रयोग ठळकपणे झळकू लागला असून भगवी शाल पांघरलेले राज ठाकरे हे या पोस्टर्सवर दिसू लागले आहेत. त्यांनी अशी लाइन धरणे अयोग्य नाही. पण ही लाइन घेण्यात त्यांना जरा विलंबच झाला आहे. अर्थात, त्यांनी आपल्या पक्षाला कोणती दिशा द्यायची हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण राज ठाकरे यांनी स्वीकारलेली ही आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका ही भाजपशी जवळीक साधण्यासाठी आहे की, स्वतःचे राजकीय अस्तित्व कायम ठेवून भाजपच्याच हिंदुत्वावादी मतपेढीवर डल्ला मारण्यासाठी आहे हे लवकरच स्पष्ट होईल.
मनसेशी महापालिका निवडणुकीपूर्वी थेट युती करणे हे आज भाजपला राजकीयदृष्ट्या सोयीचे नाही. कारण मुंबईत परप्रांतीय मतदारांची संख्या मोठी आहे आणि राज ठाकरे यांनी या आधीच्या काळात परप्रांतीयांविषयी जी अत्यंत कडवट भूमिका घेतली होती त्याचा फटका आपल्यालाही बसू शकतो याची जाणीव भाजप नेत्यांनाही आहे. त्यामुळे ते आज तरी मनसेच्या संबंधात जरा सावधच बोलताना दिसत आहेत. आणि दुसरे असे की भाजपशी थेट युती करणाऱ्या पक्षाला जाहीर सभांमधून थेट मोदींचे गुणगान गावे लागते. अशा प्रकारच्या युतीत हा एक क्रमप्राप्त भाग असतो. अशा वेळी राज ठाकरे यांच्या तोंडून मोदींचे गुणगान सुरू झाले तर लोकांना ते कितपत रूचेल हेही पाहावे लागेल. कारण याच राज ठाकरे यांच्या तोंडून मोदींच्या कारभाराची व्हिडिओ सभांच्या माध्यमातून जी वासलात लावली गेली होती ते लोक विसरलेले नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना किंवा मोदी किंवा भाजपवर काही बोलणे सोडून केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांनाच लक्ष्य केले. हीसुद्धा त्यांची एक कॅलक्युलेटेड लाइन असावी, पण शरद पवारांवर टीका करण्याने मनसेला नेमका कसा लाभ होणार आहे, याचे आकलन मात्र नीट होत नाही.
शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्यावरही कालच्या सभेत त्यांनी कोणतीही आक्रमक भूमिका घेतलेली दिसली नाही. त्यामुळे हिंदुत्वाची लाइन धरून शरद पवारांना झोडण्याच्या प्रकारामागचे गणितही नीट उलगडत नाही. बाकी भोंग्यांचा विषय आणि त्याची डेडलाइन त्यांनी कायम ठेवली आहे. त्यातून जी काही स्थिती उद्भवेल ती स्थिती हाताळण्यात राज्य सरकारही काही फार लेचेपेचे नाही. राज्यात दंगलसदृश स्थिती निर्माण करून राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्रयत्नाला हातभार लावण्याची भूमिका राज ठाकरे घेत असल्याचा निष्कर्ष काही जणांनी काढला असला, तरी ते तसेच असेल असे आज ठामपणे सांगता येत नाही. हा सारा ऊहापोह केल्यानंतर राज ठाकरेंना लाइन सापडली आहे एवढा एकच निष्कर्ष औरंगाबादच्या सभेतून काढता येईल. या खेरीज या सभेचा अन्य काही अन्वयार्थ नाही.