Jagdeep Dhankhar Mimicry : विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर संसदेच्या संकुलात उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक गौतम नावाच्या वकिलाने डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ती स्वीकारली आहे. त्याआधारे तपासही सुरू करण्यात आला आहे. अभिषेकने आपल्या तक्रारीत उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याचा दावा केला असून तृणमूल खासदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी याविषयी माहिती दिली. काही वकिलांनी तक्रार दिली आहे. हे प्रकरण नवी दिल्ली जिल्ह्याशी संबंधित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तक्रार प्राप्त झाली असून ती नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे पाठवण्यात आली आहे. तसेच पुढील तपस करण्यात येत आहे. असे पोलिसांनी म्हटले आहे.
हे प्रकरण सभागृहाबाहेर असून तक्रारीवर कारवाई झाल्यास अटकही होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र, तक्रारीच्या आधारे कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे याबाबत ठोस काहीही सांगता येत नाही. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.