नवी दिल्ली – कराचीमधील 150 वर्षे जुने मंदिर जमीनदोस्त करण्यात आले आहे. कराचीतील सोल्जर बाजार परिसरातील मारी मातेचे हे मंदिर शुक्रवारी रात्री उशिरा पाडण्यात आले. या परिसरातील वीजपुरवठा खंडित झालेला असल्यामुळे मंदिर पाडण्याच्या कारवाईबाबत फारशी कोणालाच माहिती नव्हती.
शनिवारी सकाळी मंदिराच्या ठिकाणी बुलडोझर, मातीचे ढिगारे आणि राडारोडा हटविण्यासाठी ट्रक आलेले दिसले. मंदिराचा गाभारा आणि मुख्य प्रवेशद्वार तेवढे शिल्लक ठेवण्यात आले आहे. मंदिर पाडण्याच्या कारवाईला संरक्षण देण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटादेखील तैनात होता. पाकिस्तान-हिंदू परिषद, मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह आणि सिंध पोलीस महानिरीक्षक यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी विनंती हिंदू समुदायाने केली आहे.
सोल्जर बाजार पोलीस स्टेशनजवळच असलेल्या चोहित्राम रोडवर हे मारी माता मंदिर होते. हे मंदिर 150 वर्षे जुने होते. या मंदिराच्या आवारात जुना खजिना पुरून ठेवला असल्याच्या अख्यायिका सांगितल्या जात होत्या, असे जवळच्या पंतमुखी हनुमान मंदिराच्या श्रीराम नाथ मिश्रा महाराजांनी सांगितले. तब्बल 400 ते 500 चौरस यार्डाच्या परिसरातल्या मंदिराच्या जमिनीवर अतिक्रमण झाले होते. ही वास्तू धोकादायक झाल्यामुळे ती कधीही पाडली जाऊ शकेल, असे बोलले जात होते.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची परस्पर विक्री
या मंदिराचे व्यवस्थापन मद्रासी हिंदू समुदायाकडे होते. आपल्याला इम्रान हशिम आणि रेखा ऊर्फ नागीन बाई या दोन व्यक्तींनी तेथून जाण्यास भाग पाडल्याचे या व्यवस्थापनाने म्हटले आहे. या दोन व्यक्तींनी व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारणीसाठी या मंदिराची जमीन बांधकाम व्यावसायिकाला विकली असून, त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली गेली असल्याचेही बोलले जात आहे.