पुणे – ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून आधार अद्ययावत करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, लाभ यांसह रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, मोबाइल सीमकार्ड घेणे किंवा अद्ययावत करणे, बॅंक खाते उघडण्यापासून ते अगदी स्मशानभूमीपर्यंत सर्व ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधारची मागणी केली जाते.
या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. आधारवरील लिंग, नाव, पत्ता, छायाचित्र आदींमध्ये बदल झाल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असते.