पुणे – केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या पहिल्या फेरीत क्वॉलिफायर पारस दहिया, देव जाविया या भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर आर्यन गोवीस, करण सिंग यांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. दुहेरीत फैजल कुमार व ध्रुव सुनीश यांनी अव्वल मानांकित जोडीवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रिधा याने भारताच्या आर्यन गोवीसचा टायब्रेकमध्ये 7-6 (3), 7-5 असा पराभव केला. हा सामना 2 तास 30 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये आर्यनने जोनाथनची, तर दुसऱ्या गेममध्ये जोनाथनने आर्यनची सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर बाराव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये जोनाथनने जोरदार खेळ करत आर्यनविरुद्ध हा सेट 7-6 (3) असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या आर्यनने आपल्या खेळात नवीन रणनीती आखत दुसऱ्या गेममध्ये जोनाथनची सर्व्हिस भेदली व सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी आर्यनला फार काळ टिकविता आली नाही. पुढच्याच गेममध्ये जोनाथनने आर्यनची सर्व्हिस रोखली व ही आघाडी 2-1 कमी केली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ केला व सामन्यात 5-5 अशी बरोबरी निर्माण झाली. अखेर जोनाथनने वरचढ खेळ करत अकराव्या गेममध्ये आर्यनची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 असा जिंकून विजय मिळवला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या पारस दहिया याने क्वॉलिफायर सूरज आर प्रबोधचा 6-2, 7-6 (10) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
भारताच्या देव जाविया याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या साई कार्तिक रेड्डी गंताचे आव्हान 7-6 (2), 6-4 असे मोडीत काढले. स्वीडनच्या फिलीप बर्गेवी याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या करण सिंगला 6-2, 7-5 असे पराभूत केले. चुरशीच्या लढतीत हंगेरीच्या झोंबोर वेल्ज याने इटलीच्या मार्को बृगेनरोटोचा 4-6, 6-4, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अन्य लढतीत भारताच्या निकी पोनाच्चा कलियांदा हा पहिला सेट 6-1 असा पराभूत झाल्यानंतर त्याच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे त्याने सामना सोडून दिला व त्यामुळे क्वॉलिफायर ग्रेट ब्रिटनच्या हेनरी पॅटन पुढे चाल देण्यात आली.
दुहेरीत पहिल्या फेरीत फैजल कुमार व ध्रुव सुनीश या जोडीने अव्वल मानांकित एन विजय सुंदर प्रशांत व विष्णू वर्धन या जोडीचा 6-4, 3-6, 10-6 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. याआधी स्पर्धेचे उद्घाटन भारताची अव्वल मानांकित टेनिसपटू अंकिता रैना, एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे, डेक्कन जिमखानाचे प्रमोद बाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धेचे सहसंचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर शीतल अय्यर व मान्यवर उपस्थित होते.