पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित 15 हजार डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या पहिल्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या डालीबोर सेव्हर्सिना याने अव्वल मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देत खळबळजनक निकालाची नोंद केली. एकेरीत पहिल्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या डालीबोर सेव्हर्सिना याने भारताच्या अव्वल मानांकित सिद्धार्थ रावतचा 6-4, 6-1 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. डालीबोरने सिद्धांतचे आव्हान 1 तास 28 मिनिटात मोडीत काढले.
सामन्यात 2-1 अशा फरकाने सिद्धांत आघाडीवर असताना डालीबोरने जोरदार कमबॅक करत सातव्या, नवव्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील सिद्धांतला अखेरपर्यंत सूर गवसलाच नाही. या सेटमध्ये डालीबोरने वर्चस्व राखत दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा एकतर्फी जिंकून विजय मिळवला.
भारताच्या सहाव्या मानांकित मनीष सुरेशकुमार याने इटलीच्या लोरेंझो बोकचीचा 6-1, 6-4 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. हा सामना 1 तास 41 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये मनीषने आक्रमक खेळ करत लोरेंझोची चौथ्या व सहाव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सामन्यात 2-1 अशा फरकाने मनीष आघडीवर असताना लोरेंझोने मनीषची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर मनीषने चतुराईने खेळ करत नवव्या गेममध्ये लोरेंझोची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला.
भारताच्या सातव्या मानांकित अर्जुन कढे याने एस डी प्रज्वल देवचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(3) असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 1 तास 50 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये अर्जुनच्या बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळीपुढे देवची खेळी निष्प्रभ ठरली.
या सेटमध्ये अर्जुनने दुसऱ्या, सहाव्या गेममध्ये देवची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकला. क्वालिफायर भारताच्या एन विजय सुंदर प्रशांत याने फैजल कुमारचा 6-4, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.