नवी दिल्ली – भारतीय नेमबाजांनी विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत वर्चस्व राखले. नवोदित तसेच अनुभवी खेळाडूंच्या भारतीय संघाने जवळपास प्रत्येक गटात वैयक्तीक तसेच सांघिक पदकांची कमाई केली. सौरभ चौधरीने मनू भाकरसह तर दिव्यांशसिंग पनवारने एलाव्हेनिल वालारिवानसह दुहेरीत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेतला.
आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत या नेमबाजांनी 10 मीटर एअर पिस्तूल व 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. सौरभ-मनू यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला मिश्र सांघिक सुवर्णपदक मिळवून देत पदकतालिकेत भारताचे अग्रस्थान अधिक भक्कम केले. सौरभ-मनू या भारताच्या युवा जोडीने इराणच्या गोलनोश सेबाटोलाही आणि जावेद फोरौघी यांच्यावर 16-12 अशी मात केली.
भारताचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक ठरले. त्याचबरोबर सौरभ-मनूचे हे मिश्र सांघिक प्रकारातील पाचवे सुवर्णपदक ठरले. याच गटात यशस्विनी सिंह देस्वाल आणि अभिषेक वर्मा या युवा जोडीने तुर्कीच्या सेवाल इलायडा तरहान आणि इस्माइल केलेस यांच्यावर 17-13 असा विजय मिळवत ब्रॉंझपदक पटकावले.
त्याआधी दिव्यांश-एलाव्हेनिल यांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले होते. एलाव्हेनिलचे हे विश्वकरंडक स्पर्धेतील पहिले तर दिव्यांशचे चौथे सुवर्णपदक ठरले. यंदाच्या स्पर्धेतील दिव्यांशचे हे दुसरे पदक ठरले. वैयक्तिक गटात त्याने ब्रॉंझपदक मिळवले होते. भारतीय जोडीने सुवर्णपदकाच्या या सामन्यात 16 गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या हंगेरीच्या इस्तवान पेनी आणि इस्तझेर डेनेस यांना 10 गुणच मिळवता आले.
स्किट प्रकारातही वर्चस्व
भारताच्या पुरुष संघाने स्किट प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली तर महिलांना रजतपदकावर समाधान मानावे लागले. गुरजोत खांगुरा, मायराज अहमद खान आणि वीर सिंह बाजवा यांच्या भारतीय संघाने कतारच्या नासीर अलत्तिया, अली अहमद अलइशाक आणि राशीद हमाद यांच्यावर 6-2 असा विजय मिळवला.