पुणे – केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अर्जुन कढे, मनीष सुरेशकुमार या खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
एकेरीत दुसऱ्या फेरीत भारताच्या सातव्या मानांकित अर्जुन कढेने आपली विजयी मालिका कायम ठेवत चेक प्रजासत्ताकच्या डोमिनिक पॅलनचा टायब्रेकमध्ये 1-6, 7-6(4), 7-6(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. हा सामना 2 तास 59 मिनिटे चालला.
स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रीधाने भारताच्या क्वालिफायर पारस दहियाचा 6-1, 5-7, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव केला. सहाव्या मानांकित भारताच्या मनीष सुरेशकुमार याने हंगेरीच्या झोंबर वेल्जचे आव्हान 3-6, 7-6(5), 6-4 असे संपुष्टात आणले.
अन्य लढतीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित झेन खानने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या एन विजय सुंदर प्रशांतचा 6-3, 7-5 असा पराभव केला. ग्रेट ब्रिटनच्या तिसऱ्या मानांकित एडन म्युकुकने क्वॉलिफायर भारताच्या इशाक इकबालचा 6-1, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या मानांकित आर्यलॅंडच्या सिमॉन कारने स्वीडनच्या फिलीप बर्गेव्हीचा 6-2, 7-6(7) असा पराभव केला. अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑलिव्हर क्रॉफर्ड याने भारताच्या देव जावियाचा 4-6, 6-1, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत अन्वित बेंद्रे व परीक्षित सोमाणी या जोडीने एस डी प्रज्वल देव व नितीन कुमार सिन्हा यांचा (10)6-7, 6-4, 10-7 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.