युती केली हेच चुकले ! नाहीतर …- देवेंद्र फडणवीस

मुंबई – २०१९च्या विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढलो असतो तर भाजपला १५०पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच युती केली हेच चुकले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी व्हर्चुअल रॅली झाली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकिताचा संदर्भ देत फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि,  २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत भाजपाला मोठे बहुमत मिळण्याचा भाऊ तोसरेकर यांनी अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, भाजप जर स्वतंत्र लढला तर १५० पेक्षा अधिक आणि युती झाली तर २०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज होता. परंतु, आम्ही युतीचा पर्याय निवडला आणि हीच चूक केली. व पुढचा इतिहास घडला, असे त्यांनी सांगितले.

दादरमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळ्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे इंदू मिलची जागा मिळाली. आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजनही  झाले. दीड वर्षात बरेच कामदेखील झाले. मात्र, अचानकपणे हा पायाभरणीचा कार्यक्रम का घेण्यात आला होता ते मला माहिती नाही. पण कार्यक्रम जरी करायचा असेल तर मग लपून-छपून का करता ? असा कार्यक्रम उघडपणे केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, दादरमधील इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा शुक्रवारी अचानकपणेच स्थगित करण्यात आला. या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यक्रम घोषित करु, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.