पिंपरी – राज्य सरकारच्या निकषानुसार कोविड -19 च्या बाधितांकडून वैद्यकीय बिल आकारले जात असतानादेखील महापालिकेचे अधिकारी बिलांबाबत नाहक मानसिक त्रास देत आहेत. गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. अशा विविध समस्यांचा पाढा शहरातील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालय चालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढे वाचला. त्यावर यातून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी शिष्टमंडळाला दिले.
कोविड रुग्णांवर उपचार केले जात असलेल्या शहरातील विविध रुग्णालयाच्या मालकांनी खासदार बारणे यांची नुकतीच भेट घेतली. आपल्या अडचणी, पालिकेकडून होणारा नाहक त्रास याची माहिती त्यांनी खासदार बारणे यांना दिली. राज्य व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार आमच्या रुग्णालयांना पूर्ण समर्पित कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केले आहे.
करोना कालावधीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. ऑक्सिजनचे शुल्क जास्त आहे. बिलांबाबत सरकारच्या नियमांचे पालन केले जात असताना पालिकेचे अधिकारी मानसिक त्रास देत आहेत. बिलांच्या ऑडीटसाठी 12-12 तास बसवून ठेवले जाते. संबंधित अधिकारी आमच्यासोबत गुन्हेगारांसारखे वागतात. त्यांनी सूचनांचा योग्यरित्या अभ्यास केल्याशिवाय आम्हाला सूचना पाठविल्या आहेत. असा छळ थांबविण्याचे निर्देश द्यावेत. त्रास असाच सुरू राहिल्यास या परिस्थितीत कोविड केंद्रे बंद करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही, असे विविध मुद्दे या शिष्टमंडळाने मांडले.
खासगी रुग्णालयांना वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालिका प्रशासनाशी चर्चा केली जाईल. नाहक त्रास देऊ नका, अशी सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिली जाईल, असे आश्वासन खासदार बारणे यांनी हॉस्पिटलमालकांना दिले.