‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित
डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच झळकणार आहेत. ही माहिती काही दिवसापूर्वी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्सने ट्विटरवरुन दिली होती. जगभरातील 180 देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळणार आहे. नुकताच या शोचा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला असून काही कालावधीमध्येच तो लोकप्रियही झाला आहे.
या ट्रेलरमध्ये बेअर पंतप्रधान मोदी यांना जंगली श्वापदांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी हत्यारांचा वापर कसा करायचा हे सांगत होता. यावेळी त्याने चाकू काठीला बांधत त्याचा भाला म्हणून वापर कसा करायचा हेदेखील सांगितले. मात्र एखाद्याला ठार मारण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत, असे उत्तर मोदींनी दिलं. प्रदर्शित झालेला ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यामध्ये पंतप्रधान मोदी बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी करताना दिसत आहेत. यावेळी बेअरने मोदी यांना जंगल सफारी करतानाचे अनेक बारकावे सांगितल्याचं पाहायला मिळालं. तर मोदी यांनीदेखील त्यांच्या जीवनातील अनेक अनुभव शेअर केले.