नागवडेंना सत्तेत बसविण्याची जबाबदारी माझी : खा.विखे 

श्रीगोंदा  – गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भाजपचीच सत्ता आहे. जिल्ह्याच्या राजकारणात नागवडे कुटुंबीय चुकीच्या गाडीत बसले होते. आता आमच्या गाडीत बसा तुम्हाला कारखाना, नगरपालिका, घोड-कुकडी आणि साकळाई पाणीप्रश्न सोडवण्यासह सर्व स्थरावर विखे कुटुंब तुमच्या पाठीशी उभे राहील. नागवडेंना श्रीगोंद्यात सत्तेवर बसविण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही देत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नागवडेंना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले.

शनिवारी (दि.5) दुपारी ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांच्या सहविचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपस्थित राहत खा. विखे यांनी कॉंग्रेस नेत्या अनुराधा नागवडेंना उमेदवारी मागे घेऊन भाजप प्रवेश करण्याचे आवाहन केले. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती.

माजीमंत्री हर्षवर्धन पाटील आणि खा.विखे यांच्या मदतीने भाजपकडे देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले.मात्र आजही विखे कुटुंबाने साथ दिल्यास 15 दिवसात नागवडे कार्यकर्त्यांच्या बळावर आमदार होतील. इथून पुढच्या काळात आमच्याबरोबर जे येतील त्यांना सर्वोतोपरी ताकद देण्याचे काम करू.माजीमंत्री पाचपुतेंशी आमचे कधीच जमले नाही आणि भविष्यात देखील कधीच जमणार नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुजय विखे यांनी नगरपालिकेसाठी निधी, घोड, कुकडीसह साकळाईचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचा शब्द द्यावा.

यावेळी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, प्रशांत गोरे, रामदास झेंडे, शिवाजी नलावडे, रमेश जाधव, उर्मिला काटे, नितीन वाबळे, रामभाऊ रायकर आदींनी भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, दीपक नागवडे, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, सुरेश लोखंडे, बाळासाहेब नलगे, राजू गोरे, सतीश मखरे, नगरसेवक राजू लोखंडे, संतोष कोथिंबीरे, असिफ इनामदार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.