पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा पुणे दौरा अखेर निश्चित झाला आहे. 1 ऑगस्ट रोजी हा दौरा होणार असून या दौऱ्यात दोन कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे. यातील एक कार्यक्रम लोकमान्य टिळक पुरस्काराचा असून दुसरा कार्यक्रम पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच पीएमआरडीच्या प्रकल्पाचे भूमीपूजन होणार आहे. तसेच या कार्यक्रमांच्या ठिकाणीच त्यांची जाहीर सभा होणार असल्याने या निमित्ताने पुण्यात भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ असणार असल्याची राजकीय चर्चा आहे,
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याबाबत दोन्ही महापालिका आयुक्त, शहर पोलीस तसेच पीएमआरडीए तसेच जिल्हा प्रशासनाची बैठक झाली असून या बैठकीत या दौऱ्यासाठीच्या वाहतूक नियोजन तसेच इतर उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असून त्यानंतर ते स.प. महाविद्यालयात होणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येणार आहेत.
हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच असणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेनेचे घरवाटप, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रकल्प, तसेच पीएमआरडीएच्या आवास योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर होणार आहे. तूर्तास हे कार्यक्रम अंतिम नसले तरी प्रशासनाकडून या नियोजनानुसारच तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे, ही सभा भाजपच्या प्रचाराचा शुभारंभच असणार असल्याची चर्चा असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. त्यामुळे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.
पोलिसांची नियोजनाची कसरत
दरम्यान, या दिवशी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती असल्याने स्वारगेट येथे मोठया प्रमाणात कार्यक्रम साजरे केले जातात. या ठिकाणी शहराच्या अनेक भागातून मिरवणूका येतात, त्यामुळे या कार्यक्रमासाठी अनेक रस्ते बंद केले जातात. मात्र, याच दिवशी पंतप्रधानही टिळक रस्त्यावरील स.प महाविद्यालयासह, शहराच्या मध्यवर्ती पेठांमधून कार्यक्रमांसाठी जाणार असल्याने त्या दिवशी पोलिसांची वाहतूक नियोजनाची चांगलीच कसरत असणार आहे.