सातारा – जिल्हा परिषद भरतीच्या पहिल्या टप्यात चार संवर्गातील रिक्त पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही परीक्षा दि. 7 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. प्रक्रिया काटेकोर व पारदर्शकपणे पार पडणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी दिली.
जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती प्रक्रिया गेल्या सहा वर्षापासून रखडली होती. कर्मचाऱ्यांअभावी कामांचा निपटारा होण्यात अडचणी येत असल्याने राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. सातारा जिल्हा परिषदेच्या विविध 21 संवर्गातील 972 पदांची भरती प्रक्रियेसाठी पाच सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या मुदतीत उमेदवारांना अर्ज भरण्यास मुदत होती. आता प्रत्यक्ष चार संवर्गासाठी सात ऑक्टोबरपासून परीक्षा सुरु होणार आहे. दि. 7 ऑक्टोबरला रिंगमन, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), दि.8 ऑक्टोबरला विस्तार अधिकारी (सांख्यिकी), दि. 10 ऑक्टोबरला विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, दि. 11 ऑक्टोबरला लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होईल.
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरुन उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात एक डेमोलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रिकेवर परीक्षेच्या केंद्राची माहिती मिळणार आहे. या भरतीमध्ये रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राबविण्यात येणार असून कोणत्याही आमिष, प्रलोभनाला बळी पडू नये.
– ज्ञानेश्वर खिलारी (मुख्य कार्यकारी अधिकारी)