मुंबई – सध्या सगळीकडे ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचीच चर्चा रंगली असल्याचं दिसून येत आहे. 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कुठे प्रेक्षक चित्रपटावर टीका करत आहेत. तर कुठे चित्रपटविरोधात थेट दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय.
दरम्यान, आदिपुरुष चित्रपटात मराठमोळ्या कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता ‘देवदत्त नागे’ हनुमानाच्या भूमिकेत दिसून आला आहे. तर, दुसरीकडे मराठमोळी अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ने शुर्पणखाची भूमिका साकारली आहे.
तेजस्विनीने गेल्या काही दिवसांपूर्वी ती ‘आदिपुरुष’ सिनेमात झळकणार असल्याचं जाहीर केलं होतं. या भूमिकेत ती अत्यंत रेखीव आणि सुंदर दिसत आहे. पण एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता याबाबत तिने आपल्या भावना नुकत्याच व्यक्त केल्या आहेत. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तेजस्विनी बोलत होती.
यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “या चित्रपटात मी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे शूर्पणखेची. या चित्रपटाचा मला भाग होता आलं की माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ओम राऊत मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत असल्यापासून त्याची आणि माझी मैत्री आहे. तो या चित्रपटात शूर्पणखाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होता आणि मी त्याची पहिली पसंती होते’.
तेजस्विनी पुढे म्हणाली, ‘या चित्रपटात काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्याबरोबर मला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. या सर्वांचा अभिनय क्षेत्रातील अनुभव हा खूप दांडगा आहे. याचबरोबर ते खूप नम्र आणि सहकलाकाराला सांभाळून घेत काम करणारे कलाकार आहेत’. असं देखील तेजस्विनी यावेळी म्हणाली आहे.