– विजयकुमार कुलकर्णी
पुणे -आता फसवणूक झाल्यास ग्राहकाला “तो’ राहात असलेल्या ठिकाणच्या ग्राहक मंचात दाद मागता येणार आहे. ग्राहकाला पूर्वी फसवणूक झालेल्या जुरिडिक्शनच्या ठिकाणीच दावा दाखल करता येत होता. मात्र, ग्राहक संरक्षण कायद्यात झालेल्या सुधारणानुसार हा बदल झाला आहे. हा बदल ग्राहकाच्या हिताचा असून, ग्राहकाला त्याचा फायदा होणार आहे.
स्थळ सीमेवर ठरणारे ज्युरिडिक्शन आधारे खटला दाखल करण्याच्या प्रक्रियेतही नवीन कायद्यानुसार बदल करण्यात आला आहे. ग्राहकाला मंचाकडे दाद मागताना प्रतिवाद्याच्या पत्त्याच्या आधारे संबंधित ठिकाणी दाद मागावी लागत होती. नवीन कायद्यानुसार आता ग्राहकाच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे.
कौटुंबिक न्यायालयाच्या धर्तीवर आता ग्राहकाला तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या स्थानिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या जिल्ह्यात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. उदा. बिल्डर मुंबईचा असेल आणि तक्रारदार पुण्यातील असेल तर, तक्रारदाराला पुण्यात तक्रार दाखल करता येते. पहिल्या कायद्यात जेथे प्रतिवादी पार्टी राहते त्याच ठिकाणी तक्रार दाखल करता येत होती. म्हणजे त्या बिल्डरविरोधात मुंबईतच दावा दाखल करावा लागला असता. आता ग्राहकाला तक्रार दाखल करताना स्थल सीमेची येणारी मर्यादा देखील राहणार नाही. ग्राहकाला त्याचा फायदा होणार आहे.
ग्राहक मंचाच्या नावातही बदल
ग्राहक संरक्षण कायद्यातील नवीन सुधारणानुसार आता ग्राहक मंचाचे नाव बदलण्यात आले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच आणि अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे नाव बदलून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग असे करण्यात आले आहे. जिल्हा ग्राहक आयोगात शहरासंदर्भातील प्रकरणे दाखल करता येणार आहे. तर अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाकडे ग्रामीण भागाशी संबंधित दावे दाखल करण्याची मुभा असणार आहे.
ग्राहक कायद्यातील हा बदल ग्राहकांसाठी सोयीस्कर बनला आहे. स्वागतार्ह आहे. ग्राहक आता अधिकार वापरण्यावासून वंचित राहणार नाहीत. दुसऱ्या ठिकाणाहून फसवणूक झाल्यास तेथे जाऊन दावा दाखल करणे, तारखांना हजर राहणे, प्रॅक्टीकली शक्य नव्हते. त्यामुळे दावा दाखल करण्यास काही ग्राहक टाळाटाळ करत असत. मात्र, आता परिस्थिती बदलणार आहे. “ग्राहक राजा’ राजासारखा त्याच्या राहत्या ठिकाणाहून तक्रार करू शकणार आहे.
– ऍड. महेंद्र दलालकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, ग्राहक सेवा संस्था