160 कोटींच्या निधीचा विनियोग नेमका कोठे झाला? कोविड केअर फंडाची श्‍वेतपत्रिका जारी करा

कॉंग्रेसची उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी

लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने कोविड उपचारासाठी कोविड केअर फंड नावाने जो स्वतंत्र निधी जमवला आहे, त्याच्या जमाखर्चाच्या तपशिलाची श्‍वेतपत्रिका जारी करा, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी या संबंधात जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एप्रिल 2020 मध्ये हा निधी स्थापन करण्यात आला असून, त्यात समाजातील विविध घटकांनी मदत दिली आहे.

आमदारांचा एक वर्षाचा निधी गोठवून तो या फंडात जमा करण्यात आला असून, आमदार व मंत्र्यांना मिळणाऱ्या वेतनाची 30 टक्के रक्‍कमही या फंडात जमा करण्यात आली आहे. या हिशेबाने या निधीत मोठी रक्कम जमली आहे. हा निधी कोविड उपचारासाठी वापरला जाणार असल्याचे सांगितले गेले होते. आज राज्यात कोविडची दुसरी विनाशकारी लाट येऊनही हा निधी नेमका कोठे वापरला गेला आहे ते निदर्शनाला आलेले नाही, असेही लल्लू यांनी म्हटले आहे.

राज्यातील लोकांना ऑक्‍सिजन, बेड्‌स, रुग्णवाहिका अशा साध्या साध्या गोष्टींची मोठी कमतरता जाणवत असताना लोकांना या निधीतून त्यासाठी काही मदत होणे अपेक्षित होते. पण तसे काही होताना दिसत नाही, असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. त्यामुळे या निधीची आता श्‍वेतपत्रिका जारी होणे गरजेचे आहे. 

कोविडग्रस्तांसाठी हा निधी वापरण्याऐवजी तो अन्यत्रच वापरण्यात आल्याने लोकांचे प्राण गेल्याचा आरोपही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. या निधीपैकी 160 कोटींच्या निधीचा विनियोग नेमका कोठे झाला आहे हे लोकांना सांगण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.