नवी दिल्ली – करोनाच्या आपत्तीतील मदत म्हणून फ्रांसने भारताला 28 टन वैद्यकीय सामग्री मदत म्हणून पाठवली आहे. त्यात आठ मोठ्या ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा समाविष्ट आहे. यातील प्रत्येक प्लांट 250 रुग्ण क्षमतेच्या रुग्णालयाला सतत 24 तास ऑक्सिजन पुरवठा करू शकतो. या प्लांटचा उपयोग हवेतील ऑक्सिजन संकलित करण्यासाठी होऊ शकणार आहे.
यातील सहा ऑक्सिजन प्लांट दिल्लीला आणि हरियाना व तेलंगणाला प्रत्येकी एक प्लांट दिला जाणार आहे. ही सामग्री पाठवण्यासाठी फ्रांसहून एक स्वतंत्र मालवाहू विमान पाठवण्यात आले आहे. त्यांनी पाठवलेल्या या मालाची एकूण किंमत 17 कोटी रुपये इतकी आहे.
फ्रांसच्या अडचणीच्या काळातही भारताने आम्हाला मदत पाठवली होती. त्यामुळे भारताच्या अडचणीच्या काळात भारताला मदत करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे फ्रांसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
त्यांनी पाठवलेल्या सामग्रीत 28 व्हेंटिलेटर्स, 200 इलेक्ट्रीक सिरिंज पंम्पस यांचाही समावेश आहे. आज रविवारी बेल्जियमनेही भारताला रेमडेसिव्हिरच्या 9 हजार वायल्स पाठवल्या आहेत. शुक्रवारी दोन मालवाहू जहाजातून अमेरिकेनेही मोठ्या प्रमाणात भारताला वैद्यकीय सामग्री पाठवली आहे.