नवी दिल्ली – चांद्रयान-3 ( Chandrayaan 3) मध्ये सर्व आवश्यक वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली होती. या उपकरणांनी गोळा केलेल्या डेटावर इस्रोसह (ISRO ) सर्व शास्त्रज्ञांची टीम समाधानी आहे. डेटाचे आता विश्लेषण केले जाईल. ही एक प्रक्रिया अनेक वर्षे चालू शकते. ज्या हेतूने चांद्रयान-3 पाठवण्यात आले होते, तो हेतू सफल झाला असून बरीचशी अतिरिक्त माहितीही इस्रोकडे जमा झाली आहे, असे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी केले आहे.चांद्रयान-3 च्या लॅंडर आणि रोव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अद्याप कोणताही सिग्नल मिळालेला नाही, अशी माहितीही सोमनाथ यांनी दिली.
सोमनाथ म्हणाले की, अभ्यासादरम्यान हे उघड झाले की, चांद्रयान-2 पाठवण्याआधी आम्ही पृथ्वीवर त्याची पूर्ण चाचणी करू शकलो नव्हतो. पण आता आमच्याकडे समान आणि वास्तविक परिस्थिती आहे, त्यामुळे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध आहे. या महत्त्वाच्या डेटासह आम्हाला त्याची उजळणी करण्याचा आत्मविश्वासही मिळाला आहे. आता नव्याने उपकरणांचा विकास, सॉफ्टवेअर चाचणी आणि शेकडो चाचण्या घेणे आवश्यक आहे. तरच मिळालेल्या डेटाचा सदुपयोग झाला, असे म्हणता येईल.
सोमनाथ असेही म्हणाले की, शेवटी, आपण चंद्रावर जातो आणि इथे मिळणारी माहिती मानवतेला कशी उपयोगी पडेल, हे पाहण्यासाठी जातो. त्यासाठी आपल्याला चंद्रावर परत जावे लागेल. म्हणून, आता केवळ चंद्रावर यान पोहोचवणे एवढेच मर्यादित उद्दीष्ट्य न ठेवता, तेच यान परत पृथ्वीवर कसे आणता येईल, यावरही विचार करायला लागेल.
चंद्र, मंगळावर अधिवास आवश्यक
जर मानवतेला पृथ्वीच्या पलीकडे प्रवास करायचा असेल तर चंद्र, मंगळ आणि एक्सोप्लॅनेटवर अधिवास निर्माण करण्याची गरज आहे आणि तिथे भारतीय असले पाहिजेत. आम्ही आज स्वत:ला कमी दर्जाचे समजतो की, आम्ही तांत्रिकदृष्ट्या प्रगत नाही, आर्थिकदृष्ट्या फारसे शक्तिशाली नाही आणि आम्ही नेहमी विचार करतो की आम्ही गरीब आहोत. त्यामुळे आम्ही त्यात गुंतवणूक करू शकत नाही. पण माझा विश्वास आहे की, आम्ही अशा मोहिमा केल्या पाहिजेत. ज्या राष्ट्राला असे वाटते की ते ज्ञानाचे निर्माते आहेत, त्यांनी अशा मोहिमा करायला हव्यातच, असेही सोमनाथ यांनी सांगितले.