मुंबई – सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ लवकरच टीव्हीवर पुनरागमन करत आहे, वर्षभरानंतर सुरू होणारा हा शो कलर्स टीव्हीवर नसून ‘सोनी टीव्ही’वर प्रसारित होणार आहे. ‘झलक दिखला जा’ची सुरुवात सोनी टीव्हीवरूनच झाली होती.
पण चार सीझननंतर हा धमाकेदार शो सोनी टीव्हीवरून कलर्स टीव्हीवर गेला. मात्र, आता सहा सीझननंतर पुन्हा एकदा हा डान्स रिअॅलिटी शो त्याच्या मूळ वाहिनीवर परतत आहे.
नव्या वाहिनीसोबतच ‘झलक दिखला जा’मध्ये नवीन जजही दिसणार आहेत. या शोचा 10 वा सीझन माधुरी दीक्षित, करण जोहर, नोरा फतेही आणि टेरेन्स लुईस यांनी होस्ट केला होता. पण आता चॅनलसोबतच या शोचे जज पॅनलही पूर्णपणे बदलले जाणार आहे.
सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर करताना लिहिले आहे, की त्यांचा आवडता शो लवकरच पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. यंदा या शोचा हा 11 वा सीझन असणार आहे.
‘झलक दिखला जा’चा पहिला सीझन 2006 मध्ये सुरू झाला. शिल्पा शेट्टी, फराह खान आणि संजय लीला भन्साळी या शोचे जज होते. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगने हा शो जिंकला, तर श्वेता साळवे या सीझनची उपविजेती ठरली. पहिला सीझन खूप यशस्वी ठरला होता.