देर अल-बालाह – गेले अनेक दिवस हवाई हल्ले करुन गाझापट्टीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या इस्रायलच्या लष्कराने आता जमिनीवरील हल्ले सुरु केले आहेत. याशिवाय गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेच्या निवडक लक्ष्यांवर हवाई हल्ले सुरुच ठेवण्यात आले आहेत. या जमिनीवरच्या हल्ल्यात 50 हून अधिक ओलिसांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर गाझा सीमेवर इस्रायलचे सैन्य तैनात होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा खात्मा होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे म्हटले आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा हल्ला केला.
या काळात हमासकडून 5000 हून अधिक रॉकेट डागण्यात आले. आणि हमासचे सैनिक इस्रायलच्या हद्दीत घुसले होते. या हत्याकांडानंतर हमासच्या सैनिकांनी गाझा पट्टीत काही लोकांना ओलीसही ठेवले होते.
इस्त्रायली सैन्याने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या भूदलाने लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या मदतीने गाझामध्ये एकापाठोपाठ हल्ले केले. लष्कर गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीवर हल्ल्याची तयारी करत होते.
लष्कराच्या एका निवेदनात म्हटले आहे की, आयडीएफच्या भूदलाने लढाऊ विमाने आणि यूएव्हीसह मध्य गाझा पट्टीमध्ये हल्ला केला. आयडीएफने अनेक दहशतवादी लक्ष्य ओळखले आणि हल्ले केले.
यामध्ये रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रक्षेपण साइट, लष्करी कमांड आणि नियंत्रण केंद्रे तसेच हमासचे दहशतवादी यांचा समावेश आहे. जमिनीवरचा हल्ला केल्यानंतर इस्रायली सैनिक त्यांच्या भागातून सुखरुप परतले.
7 ऑक्टोबर इतिहासातील काळा दिवस
लष्कराने गुरुवारी रात्री पॅलेस्टिनी भूभागाच्या उत्तरेकडील भागात रणगाडे आणि भूदलांचा वापर करून अशीच जमीनी कारवाईची अल्पशी सुरूवात केली होती.
इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या बंदुकधारींच्या मोठ्या गटाने गाझामधून इस्रायलमध्ये प्रवेश केला. त्यांनी एकाचवेळेस 1,400 लोक मारले. यातले सर्वाधिक लोक हे निष्पाप नागरिक होते.
त्याच वेळी हमासने 224 हून अधिक लोकांचे अपहरण केले. त्यामुळेच नेतन्याहू यांनी 7 ऑक्टोबरला काळा दिवस म्हटले आहे. हमास-नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्त्युत्तराच्या इस्रायली हवाई आणि रॉकेट हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीमध्ये 2,913 मुलांसह किमान 7,028 लोक ठार झाले आहेत.
रक्तपाताचे सत्र सुरुच…
गाझामध्ये 7,000 लोक मारल्यानंतरही रक्तपात आणि हिंसाचाराचे चक्र थांबलेले नाही. या 7,000 लोकांपैकी 3,000 निष्पाप मुले होती. असा कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा नाही ज्याचे उल्लंघन झाले नाही. असा कोणताही सन्मान नाही ज्याचे उल्लंघन झाले नाही.
असा कोणताही कायदा नाही ज्याची पायमल्ली झाली नाही. इथे माणुसकी कधी जागी होणार? इतके जीव गमावल्यानंतर. इतक्या मुलांचा त्याग केल्यावर, माणूस असण्याची जाणीव उरते का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
हमासच्या तीन सैनिकांना केले ठार
इस्त्रायली सैन्याने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या फायटर जेट्सनी दराज तुफाह बटालियनमध्ये हमासच्या तीन सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार केले.
या बटालियनच्या सैनिकांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आणि प्राणघातक हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे जवान हमास या दहशतवादी संघटनेचे सर्वात महत्त्वाचे ब्रिगेड मानले जात होते.
हमास करते नागरिकांवर हल्ले
इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की ते केवळ अतिरेकी लक्ष्यांवर हल्ला करतात. हमास आपल्या सैनिकांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात नागरिकांवर हल्ले करत असल्याचा आरोप इस्रायल लष्कराने केला आहे.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 7 ऑक्टोबरच्या हत्याकांडातील दोन मास्टरमाइंडपैकी एक, हमासच्या गुप्तचर युनिटचा प्रमुख, शादी बरुड मारला गेला. तर युद्ध सुरू झाल्यापासून पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलवर हजारो रॉकेट डागले आहेत.
हमास म्हणते ओलिस मारले गेले…
हमासच्या लष्करी शाखेने गुरुवारी सांगितले की, इस्रायली बॉम्बफेकीत आतापर्यंत सुमारे 50 ओलीस मारले गेले आहेत. यावर इस्रायली अधिकाऱ्यांकडून कोणतीही तात्काळ टिप्पणी झाली नाही. आता या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
युद्धाची व्यापकता वाढते आहे…
लेबनॉनमधील हमासचा इराणी-समर्थित सहयोगी हिजबुल्लाह, सीमेवर इस्रायलशी वारंवार गोळीबार करत आहे आणि इस्रायलने सीरियातील इराणशी संबंधित गटांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले आहेत.
इराण आणि त्याच्या सहयोगींना हमासच्या बाजूने युद्धात प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्यासाठी युनायटेड स्टेट्सने अतिरिक्त लढाऊ विमाने आणि इतर शस्त्रे आणि कर्मचाऱ्यांसह दोन विमानवाहू स्ट्राइक गट या प्रदेशात पाठवले आहेत. त्यामुळे युद्धाची व्यापकता वाढते आहे.
आमचा देश आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहे आणि गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी केली जात आहे. आक्रमक हमासच्या सर्व सदस्यांचा मृत्यू जवळ आला आहे. या युद्धाची दोन मुख्य उद्दिष्टे “हमासची लष्करी आणि प्रशासन क्षमता नष्ट करणे आणि आमच्या ओलीसांना घरी आणण्यासाठी सर्व शक्य पाऊल उचलणे, ही आहेत.
– बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलचे पंतप्रधान