Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आजचा ३४ वा दिवस आहे. हमासचा नायनाट करण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीत जमिनीवरून कारवाई (ग्राऊंड ऑपरेशन) करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलचे सैन्य गाझाच्या जमिनीवर उतरले आहे. त्यातच आता इस्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महत्वाची माहिती दिली आहे.
अधिकाऱ्याने ,”पुन्हा एकदा आम्हाला गाझा पट्टीवर ताबा मिळवायचा नाही, किंवा आम्हाला फार काळ गाझावर नियंत्रण ठेवायचं नाही, आमचा तसा कोणताही हेतू नाही. हमासविरोधात पॅलेस्टाईनच्या सीमा भागात आम्ही आक्रमक मोहीम हाती घेतली असल्याचे म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेने इस्रायलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या अधिकाऱ्याने आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर काही माहिती वृत्तसंस्थेला दिली. “आम्ही सध्या हाती घेतलेली मोहीम यशस्वी होत आहे. आम्ही असेच पुढे सरकत राहू. ही मोहीम कधीपर्यंत चालेल हे आत्ता सांगता येणार नाही. परंतु, आमची ही मोहीम अमर्यादित किंवा मोठ्या काळासाठी नाही. आमची मोहीम ओपन-एंडेड नाही. हमासचा बंदोबस्त करून आम्ही माघारी फिरू.” असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला, आमच्या लष्करी कारवाईचं एकमेव उद्दीष्ट आहे. आमच्यावर हल्ला करणाऱ्या आणि आम्हाला धमकावणाऱ्या हमासची ताकद नष्ट करणे हाच आमचा हेतू आहे. आम्हाला कल्पना आहे की या मोहिमेला बराच वेळ लागेल. परंतु, आम्हाला त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधांवर कारवाई करावी लागेल,”असेही त्यांनी म्हटले.