Pakistani Senator Faisal Raza Abidi : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या काळात काही देश इस्रायलला तर काही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानी सिनेटर फैसल रझा अबिदी यांनी इस्रायल-हमास युद्धावरून चक्क भारताला धमकी दिली आहे. भारतीयांच्या रक्ताने पॅलेस्टाईनची भूमी स्वच्छ आणि शुद्ध करणार असल्याची गरळ ओकली आहे.
पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान पाकचे सिनेटर फैसल रझा अबिदी यांनी इस्रायल-हमास युद्धावर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी आपल्या एका वक्तव्यात रफाह सीमा न उघडल्याचा उल्लेख केला होता. ते म्हणाले की, मी आता म्हणतो की राफा सीमा उघडू नये. पॅलेस्टाईन अनेक देशांना यासाठी विनंती करत होता, पण इजिप्त हा मुस्लिम देश असल्याने हे काम आधी करायला हवे होते, रफाह सीमा खुली केली असती तर बरे झाले असते. मात्र, आता हिजबुल्ला पॅलेस्टाईनच्या बाजूने उभी राहिली आहे, ती योग्य आहे असे त्यांनी म्हटले.
पुढे फैसल रझा अबिदी यांनी,”यापूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध हे नरसंहार होते, पण आता मी जगातील सर्व देशांना आव्हान देतो जे इस्रायलच्या पाठीशी उभे आहेत. अमेरिका असो वा भारत. त्यांचे संपूर्ण सैन्य इस्रायलमध्ये आणण्याचे मी त्यांना आव्हान देतो. यानंतर मुस्लिम दाखवून देतील कि खरे युद्ध म्हणजे काय? अमेरिकन आणि भारतीय सैनिकांच्या रक्ताने पॅलेस्टाईनची भूमी आम्ही स्वच्छ आणि शुद्ध करू.अशा प्रकारची धक्कादायक विधाने त्यांनी केली आहेत. या विधानाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
पाकिस्तान इस्रायलला देश मानत नाही, त्यामुळे तो इस्रायलला पाठिंबा देत नाही. याच कारणामुळे तिथले (पाकिस्तान) नेते इस्रायलच्या विरोधात वक्तव्य करताना दिसतात. यावेळी फैजल रझा अबिदी यांनी इस्रायल-हमास युद्धाबाबत दिलेल्या वक्तव्यात ते पुढे म्हणाले की, दोन देशांचा कायदा होणार नाही. तेथे मुसलमानांशिवाय कोणी राहणार नाही. इस्रायलसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक देशाच्या सैनिकांना आम्ही युद्धात ठार करू.अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे.