Israel Palestine Attack: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिना पूर्ण होत आहे. दरम्यान, गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. या युद्धात 10,022 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकार्यांच्या हवाल्याने अल जझीराच्या अहवालात म्हटले आहे. मृत्यू झालेल्यांपैकी 4104 मुले आहेत. याशिवाय अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
या अहवालात म्हटले आहे की, ढिगाऱ्याखाली अजूनही किमान 2,000 लोक दबले गेले आहेत, ज्यांना अवजड उपकरणे आणि यंत्रसामग्री नसल्यामुळे बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या घेरावामुळे लोकांना इंधन, अन्न आणि वीज यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत.
हिजबुल्लाहही हल्ले करत आहे –
इस्रायल-हमासच्या युद्धाचे परिणाम आता लेबनॉनमध्येही जाणवू लागले आहेत. हिजबुल्लाह अतिरेकी इस्रायलवर सतत रणगाड्यांद्वारे हल्ले करत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनने लेबनॉनमधून काही ब्रिटिश दूतावासातील कर्मचाऱ्यांना तात्पुरते परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
इंधन पुरवठा कमी –
कमी इंधन पुरवठ्यामुळे गाझातील 35 रुग्णालयांपैकी अनेक रुग्णालये ठप्प झाली आहेत. इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 25,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, दरम्यान, गाझामधून 15 लाखांहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 1,400 हून अधिक लोक मारले गेले होते. यानंतर इस्रायलने गाझा येथील हमासवर जोरदार हल्ले सुरू केले. हमासने 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे.