जवळपास ४०० जणांना मिळणार मोफत शिवभोजन …!
इस्लामपूर (प्रतिनिधी) : वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत येथील सई विनोद मोहिते या शाळकरी मुलीच्या वाढदिवसानिमित्त मोहिते कुटुंब ४०० जणांना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देत आहे. आज शनिवारी ( ता.११) ला ७५ जणांनी मोफत थाळीचा लाभ घेतला. सोबत पेढे ही देत तोंड गोड करण्यात आले. येत्या पाच दिवसात गरीब, गरजूंना शिवभोजन केंद्रावर मोफत जेवण मिळेल.
येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात हॉटेल पंगत मध्ये शिवभोजन थाळी मिळत आहे. येथे दररोज गरजू नागरिक शिवभोजन थाळीचे पार्सल घेण्यासाठी येत असतात. यात अनेक जण अत्यंत गरीब आहेत. त्याच्याकडे जेवण घेण्यासाठी अवघे पाच रुपयेही नसतात. ही गरज ओळखत मोहिते कुटुंबाने सईच्या वाढदिवसाचे निमित्त साधत ४०० जणांच्या थाळीचे पैसे जमा केले आहेत.
सई हिचा १४ वा वाढदिवस होता.
ती म्हणाली,” वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून तो गरजूंसाठी करावा असे वाटत होते. हातांवर पोट असणारे, भीक मागून खाणारे, पारधी व भटकंती करणाऱ्या लोकांकडे अवघे पाच रुपये हे नसतात.हे कळाल्यावर मी शिवभोजन योजनेच्या माध्यमातून माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या खर्चातून ४०० थाळीचे पैसे जमा केले.”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.हातावर पोट असणाऱ्या लोकांची मिळकत बंद झाली आहे. पर्यायाने जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते किराणा माल उपलब्ध करुन देत आहेत. पण हे शिजवावे कसे हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन थाळीचे महत्व वाढले आहे. मोहिते कुटुंबातील सई हिने वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. येथील मुक्तांगणच्या संचालक वर्षाराणी मोहिते यांची ती कन्या आहे.
आघाडी सरकारच्या प्रयत्नाने राज्यभर गरजूंना शिवभोजन सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच इस्लामपूर येथे सुरू झालेल्या केंद्रात शनिवारी सई मोहिते हिच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबविला गेला. हा उपक्रम राज्याला पथदर्शी ठरेले असे मत केंद्र संचालक रणजीत शिंदे यांनी व्यक्त केले.