इस्लामाबाद – आपले फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध करू नयेत अशा सूचना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना “आयएसआय’चे नवनियुक्त प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांनी दिल्या आहेत. गेल्याच महिन्यात अंजुम यांची “आयएसआय’चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पाकिस्तानी लष्कर आणि नागरी सरकारमध्ये “आयएसआय’ प्रमुख पदावरून दीर्घकाळापासून शीतयुद्ध सुरू होते. त्यामुळे बराच काळ ही नियुक्ती रेंगाळली होती. ले.जन. फैझ हमिद यांच्या जागेवर ले.जन. अंजुम यांची नियुक्ती झाली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून सत्ता ताब्यात घेतली जात असताना हमिद यांचे काही पत्रकारांबरोबर गप्पा मारतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सोमवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेची बैठक झाली. त्यावेळी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ नेत्यांचे फोटो प्रसिद्ध झाले होते. मात्र “आयएसआय’ प्रमुखांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. अंजुम यांच्या सूचनेवरूनच त्यांचे फोटो माध्यमांना देण्यात आले नव्हते, असे एका मंत्र्याने माध्यमांना सांगितले.
गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर रहावे, असे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पूर्वीच्या “आयएसआय’ प्रमुखांचे फोटो माद्यमांमध्ये वारंवार प्रसिद्ध व्हायला लागल्यामुळे टीका व्हायला लागली होती. म्हणून अंजुम यांनी सांगितले असल्याचे समजते आहे.